पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिला नाय चालायचं. न्हाणीत जाऊन पानी मातुर असंच प्यावं लागे. तीच सवय लागली. देसमुखाची हरणाबाई, बामणाची शकाबाई.. आमी समद्या मैतरणी.. लई याद येते. ते जाऊंदे माज काम ऐक." असे म्हणत त्या सांगू लागल्या. त्यांना पंढरीच्या वारीला जायचे होते. वाघोळ्याची बायामाणसं वेगळा गट करून वारीला निघणार होती. आसपासच्या खेड्यातले स्त्री पुरुष त्यांच्या गटात सामील होणार होते.
 'सूनबाई, लई दिसांपासून घोकतीय. पन सुभान्या नि त्याची कारभारिण मनावर घेईनात. माजे बी किती दिस ऱ्हाईले ग? म्हनून या सुनेकडे आले. बरा आहे शिरीहरी? मला पन्नासशंभर रुपये देशील? वाटेत दानापान्याला लागतील. अग तुमा वाण्याबामणाच्या देवा परिस आमचा काळा इठूबा समद्या गोरगरिबांचा हाय ग. त्यो काई मागत नाही. ही बघ तुळसीची माळ. नि यकादस. हितून हात जोडले तरी त्याला आपलं मन कळतं. पन यंदा लईच जाऊ वाटतंय गं. बघ बाई... असं म्हणत यमनामावशी गप्प बसल्या.
 त्यांचा विश्वास मी कसा फुकट जाऊ देईन? आज यमनामावशी नाहीत. आषाढातल्या दिंड्या बघितल्या. हजारो स्त्री पुरुष न थकता, जे मिळेल ते खाऊन, ऊन, धो धो पाऊस झेलत चालतांना पाहिले की मनातले श्रद्धा अंधश्रद्धांचे वाद... गोंधळ शांत होतात आणि यमना मावशींची आठवण येते. शाळेत शिकताना एक वाक्य मनात ठसले होते. We walk by faith not by sight. श्रद्धेने जगी चालतो न बहुधा, दृष्टीमुळे मानव.
 आध्यात्मिक समतेचा विचार सामान्य माणसांच्या मनात पेरणारा, अंकुरवणारा सावळा विठोबा गेल्या शेकडो वर्षांपासून सामान्यांना, ... आर्थिक, जातीय धार्मिक भेदाभेदांच्या भिंती फोडून जगण्याचं बळ देतो आहे. त्याची उत्पत्ती, त्याचा इतिहास, तो नेमका कुठून इथे आला वगैरेवर संशोधक अभ्यासक करत आहेत. करत राहतील. पण गेली शेकडो वर्षे अव्याहतपणे चालणाऱ्या दिंड्या, वाऱ्या, वारकरी संप्रदाय यांच्यातील ऊर्जा, ताजेपणा कणभरही विटलेला नाही आणि उणावेल असे ठामपणे वाटत नाही.
 परवा औरंगाबादहून येताना एक दिंडी दिसली. बरीच मोठी होती. इथे तीस टक्क्यांची अट नसल्याने निम्म्याहून जास्त महिला होत्या. सगळे सकाळच्या नाश्त्यासाठी त्या लहानशा गावात थांबले असावेत. त्या गावाने ती सोय केली होती. बायांना पुढे बसवले होते. गळ्यात टाळ अडकवलेला पँटविजारीतला एक तरुण बोलत होता. उत्सुकतेने गाडी बाजूला उभी केली.

रुणझुणत्या पाखरा / १३५