पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'सूनबाई, हाईस का घरात' अशी हाक घालीत यमुना मावशी फाटक उघडून ओट्यावर येऊन बसल्या. यमुना मावशी ही गावकडच्या वाड्या शेजारी खोपटात रहाणाऱ्या सुभान वारकाची माय.
 "बरं झालं माय. घरी सापडलीस. ममदापुरातून फाटेच निघाले. इथवर येईतो सूर्व्य डोंगर चढून वर आला. तुजी साळा असंल नव्ह? आता सहा कोस चालाया दोन चार घंटे हवेच. आंदी पानी आन. मगं माजं काम सांगते."
 यमुना मावशी समोर पाण्याचा तांब्या आणि चहाचा कप ठेवला.
 'माय, काचेच्या कोपात नको पितळी नायतर इस्टिलच्या ताटलीत दे. माजी मैतरिण - तुझी सासू खर्चली तवा पासून तिची आठवण म्हणून पितळीतच चा पिते. तू दे आता इस्टिलची ताटली. तिला जाऊन बी झाली चार वरसं. दोघींचा नाद होता. पंढरपुराची वारी बरूबर करायची... ती तर गेली.' असे म्हणत मावशी तांब्या घेऊन ओट्यावर आल्या नि एका हाताची ओंजळ करून तांब्यातलं. पाणी पिऊ लागल्या.
 'मावशी पेला दिलाय. तोंड लावून आरामात पाणी प्या.'
 "खरंय ग. पन आमी वारिक. तुज्या सासूची आन् माझी लई दोस्ती. पांदीला जाऊन आलो की कंदीकंदी माज्या खोपटा समूर ती बी टाकायची. तिथंच हातपाय धुवायची. माज्याकडे शेळ्या होत्या. निक्या दुदूचा चा दिला की पितळीतून प्यायची. मी बी तुमच्या वाड्यात चा पियाची. पन कप मातुर येगळा असे. थोरली काकी घरात होती.

१३४ / रुणझुणत्या पाखरा