पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदींनी केली. नामान्तर चळवळीतली गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव या पुरोगामी जीवन जगणाऱ्यांनी घेतलेली भूमिका म्हणजे 'मराठवाडा' म्हणून एकमनाने लढलेल्या मनाचा प्रामाणिक कौल होता.
 कितीही घाई असली तरी आंब्याला आल्यावर ते घरी येत. लिहित जा. असे सांगत. बेशरमाची झाडे, वाहत्या वाऱ्यासंगे ही सदरे लिहून मी सुरूवार केली. ह्याला ते 'द्वारकादास' म्हणत. आणीबाणीत नासिक जेलमध्ये १५०० राजकैदी होते. तिथे अण्णांची भर पडली नि अनेकांना दिलासा मिळाला. अण्णा कॅरम अप्रतीम खेळत. गोटीवरची नजर दृढ करीत. स्ट्रायकर मारता मारता ते तऱ्हेतऱ्हेचे चुटके सांगत. उर्दू शेर सांगत. अण्णा म्हणजे चालता बोलता संदर्भकोष होता. उर्दू जणू मातृभाषाच. आणि इंग्रजीवर प्रभुत्व. अण्णांच्या लेखणीला रझाकार चळवळीत धुमसणाऱ्या वादळाची धार होती. तिची अनेक रूपे. अन्यायाविरूद्ध आगीची बरसात करणारी तर कधी खाजकुयरीच्या बियांसारखी गुदगुल्या करत बेजार करणारी. कधी इतकी ऋजू की येशूख्रिस्ता समोरची मेणबत्ती उग्र वाटावी. या लेखणीवर मराठवाड्यातील लोकांनी नेहमीच प्रेम केले. 'मराठवाडा' आणि अण्णा जणू एकच.
 अण्णा 'स्वातंत्र्यातल्या तुरूगंवासा' वरही दिलखुलासपणे बोलत. होमीजी तल्यारखान प्रकरणातल्या तुरूंगवासाबद्दल बोलतांना आत्मप्रौढी नसे.
 'आणीबाणी' पूर्वीच आम्ही नवा रस्ता शोधला होता. रचनात्मक संघर्षाच्या भूमिकेतून धडपडणाऱ्या मानवलोकबद्दल त्यांना आस्था होती. त्यांच्या उबदार घरट्यात मलाही जागा होती. आज अण्णा नाहीत. सोबतीला आहेत त्यांच्या आठवणी. सदैव ताजी अशी ग्रंथ संपदा. आणि त्यांच्या गोतावळ्यात आपणही एक आहोत याची सुखद जाणीव.

रुणझुणत्या पाखरा / १३१