पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 जून महिना आला की गुरूजींची आठवण येते. त्यांच्या सहवासात घालवलेले काही क्षण पुनः पुन्हा आठवतात. त्या वेळी त्या सहवासाचे मोल कळण्याचे वय नव्हते. दहा वर्षाची होते मी. माझे वडिल स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसमधील समाजवादी गटाचे अनुयायी. डॉ. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, युसुफ मेहरअली, एस्.एम्. जोशी यांच्या विचारावर त्यांची विशेष श्रद्धा. पू. सानेगुरूजींची समाजवादावर निष्ठा. ही सर्व मंडळी व्याख्याने, बैठकीच्या निमित्ताने पश्चिम खानदेशात,...धुळे जिल्ह्यात आली की घरी येत. आमचे घर खानदेशातील समाजवादी विचारांचा दिलखुलास थांबा... अड्डा होता.
 ...गुरूजींची संध्याकाळी सभा होती. हॉलमधल्या खिडकीजवळच्या लाकडी कॉटवर ते विश्रांती घेत आडवे झाले होते. डोळा लागला होता. कॉटशेजारच्या पाळण्यात माझा सहा महिन्यांचा भाऊ झोपला होता. तो उठलाय का ते पाहण्यासाठी आईने मला पाठवले. तो उठला होता. हात पाय हालवून छान खेळत होता. त्याला उचलायला गेले तर त्याने घाण केली होती. मी दहा वर्षांची. माझ्यापाठी सोडे नऊ वर्षांनी झालेला भाऊ. मला ती घाण काढून साफ करायची किळस वाटली. मी पाळण्याजवळ गेले. घाण वास येत होता. मी जवळ ठेवलेल्या पिशवीतील जाडसर पांघरूण काढले नि त्याच्या अंगभरून टाकले. परत मधली गच्ची ओंलाडून स्वैपाकघरात येऊन खेळत बसले. पण माझे मन मला खात होते. आई गुरूजींच्या

१३२ / रुणझुणत्या पाखरा