पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फुलांचा झेला... शेला घेऊन दुर्गादेवीला अर्पण करण्यासाठी वाजत गाजत येतात. एका नाचणाऱ्या मध्यमवयीन पुरंध्रीला मी विचारलेच.
 'ताई आमी मुळची याच मातीतून जन्मलेली आणि याच मातीत मिसळून जाणारी माणसे. शेकडों वर्षांखालील काही पोर्तुगीज.. फ्रेंचांनी इथे तळ ठोकला. राज्य केले. लोकांना किरिस्ताव करण्यासाठी विहिरीत पाव टाकला, त्याचं पाणी जो पी तो झाला किरिस्ताव. त्यांच्या पुढच्या पिढ्यांतली माणसं आमी पन किरिस्ताव. पन ही दुर्गामायच आमची आई. माज्या आज्या पंजापासून आमी किरिस्ताव गाववाले हिला शेला चढीवतो...
 माझ्या सासूजी सांगायच्या. ममदापून पाटोद्यात मुस्लिमांचे डोले बसवण्यात, ते तयार करण्यात, त्या समोर धुंद होऊन नाचण्यात हिंदूंचा सहजपणे सहभाग असायचा. तर होळी धुळवडीत मुस्लिम सामिल व्हायचे. रझाकारांचा बिमोड झाला तेंव्हा काही संतापलेले हिंदू आमच्या गावात लपलेल्या मुस्लिमांना मारायला धावून आले. पाटोद्यातल्या सर्व हिंदुंनी त्यांना अडवले. आणि ताठपणे सांगितले "आमच्या गावची माणसं आमची आहेत ही. आम्ही त्यांना हात लावू देणार नाही. आधी आम्हाला हात लावा... हिंमत असेल तर.' असे ठणकावून सांगितले. त्या काळात हे असे मराठवाड्यात जागोजागी घडत होते. असे जुनी माणसे सांगतात. मराठवाड्यात स्वातंत्र्य थोडे उशीरा मिळाले. निजामाच्या दडपणाखाली त्यावेळचे पाच जिल्हे असल्याने हा भाग सर्वार्थाने मागासलेलाच होता.
 आज आम्ही आझाद होऊन साठ वर्षे होताहेत. क्षणाक्षणाला आमची वैज्ञानिक, शैक्षणिक, कृषीसंबंधीत झेप उंचावतेय. सामाजिक जाणीवा मात्र बोथटताहेत. धर्मजातीच्या अंध अहंगंडातून दंगे, धोपे, शिरकाण घेत होत आहे. हे असे का? आमचे 'माणूसपण' कमी होतेय का?

१२८ / रुणझुणत्या पाखरा