पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तुजा व्यवसाय खोटा आहे. देवीची पूजा करू नाय. एकच सांगितलं जात पात मानू नका. जन्माला येतांना धर्माचा शिक्का कपाळावर ठोकलेला नसतो. आपण फक्त माणूस असतो. बाई पुरूष सगळे सारखे.. आन् मला ते पटलं."
 "ताई आज इथंच या दुपारच्याला. जेवायला नक्की या." असे म्हणत त्याने समोरची केळीची पानं उचलली. नारळाच्या दुधात भिजवलेले पोहे, लिंबाचं लोणचं. नारळाच्या वड्या. असा रूचकर नाश्ता. तोही केळीच्या ताज्या पानावर. दुर्गेचे दर्शन झाले होतेच. तिच्यातली तृप्त शांती आत अंगभर पसरली होती. शांतादुर्गेच्या मंदिरातून बाहेर पडतांना मला जोगाईचे, योगेश्वरीचे मंदिर आठवले. माझे नातलग योगेश्वरीच्या निमित्ताने माझ्याकडे नेहमी येत. त्यांना मंदिरात नेणे, माझ्या लाडक्या विद्यार्थ्याला, अरूणला माझ्या पाहुण्यांना यथासांग दर्शन घडव हे सांगणे होईच. मी मात्र आत जाण्याऐवजी बाहेरच्या विशाल, उंचचउंच, लाकडी खांबावर लाकडी फळ्यांनी तक्तपोशी जोडलेल्या भक्कमपणे बांधलेल्या मंडपातल्या दगडी ओवरीवर बसे.
 'शैला, अग ये ना आत देवीला काय फक्त काही मागायलाच येतो का आम्ही? किती सुरेख हेमाडपंथी बांधणी आहे या मंदिराची. चपटे दगडी चिरे एकमेंकावर विशिष्ट कोनात बसवले आहेत. ते वर चढतांना आपोआप निमुळते होत वर जातात. तिथे सुंदर कलशाकार घुमट बांधलाय ये. बघ तरी.' माझी मावशी आवर्जून म्हणाली. मी आत गेले. देवीचा लांब रूंद तांदळा होता. माथ्यावर चांदीचा इथून तिथवर मोगरीच्या कळ्यांचा आकाराचा चांदीचा गजरा माळलेला होता. कपाळावर चांदीची रेखीव चन्द्रकोर होती. तांदळा असला की ती देवी खूप आदिम... शेकडो वर्षांपूर्वीची आहे असा संकेत असतो. मी हात जोडले. त्या कोंदटलेल्या गाभाऱ्यात - गर्भगृहात क्षणभर श्वास घुसमटले. बाहेरची हवाच यायला जागा नाही. मग असे होणारच. माझ्या नास्तिक मनाला आपण काही गैर केलेय असे मात्र क्षणभरही जाणवले नाही. एकदा अशीच मी गेले असता दोन तीन मुस्लिम स्त्रिया पलिकडच्या दुकानात बुरखे ठेवून आत जातांना दिसल्या पुन्हा मनात उत्सुकता. मग प्रश्न विचारणे आलेच.
 "भाभी, अरूणभैय्या हमारे वॉर्डमेसेही चुनके आये है, उनकी बहोत मदद होती है. हम हमेशा आते है. यहाँ आते तो अम्माको देवी माँ को नमस्कार करके जाते है.." तिचे उत्तर.
 .. दुपार होऊन गेलेली. मला दुर्गेच्या सुरेश पुजाऱ्याचे निमंत्रण आठवले. आम्ही तिकडे गेलो. वाटेत ताशा वाजंत्रीच्या तालावर नाचत येणारा, ख्रिस्ती गोंओकर मंडळीचा स्त्री पुरुषांचा जत्था दिसला. सुरेश सांगत होता दरवर्षी ही मंडळी एक दिवस

रुणझुणत्या पाखरा / १२७