पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणतात. मात्र तांदुळ कापडात गुंडाळून २० मिनिटे पाण्यात ठेवले तर त्याचा भात तयार होतो. पाण्यात डाळभात, पातेल्यात टाकून ठेवतात. झाकण लावून तर दगड ठेवतात. अर्ध्या तासात डाळभात तयार होतो. येथे एक राममंदीर आहे. कुलूचा राजा जगसिंह याने सतराव्या शतकात ते बांधले.
 इथून जवळच हडिंबाचे मंदिर आहे. हडिंबा म्हणजे पंडुपुत्रापैकी महाकाय भीमाची प्रेयसी हिडिंबा. वनवासात असताना पांडव हिमालयातही गेले होते. तेथील आदिवासी राजाची कन्या हिडिंबा त्याच्या प्रेमात पडली. तिने भीमाजवळ बलवान् पुत्र मागितला. ही जमात मातृसत्ताक असल्याने ती भीमाबरोबर गेली नाही. तिने भीमाला वचन दिले की त्याला गरज पडेल तेव्हा त्याने पुत्र घेऊन जावा. तो पुत्र म्हणजे घटोत्कच. येथे आईमुलाच्या नावाचे मंदिर आहे. त्याला ढुंगरी मंदिर म्हणतात. जवळच एक गुंफा आहे. तेथे लामांना धर्मप्रचाराचे प्रशिक्षण दिले जाते. मनाली जवळच मनुचे मंदिर आहे. सामाजिक आचरणाचे नियम सांगणारी मनुस्मृती इथे लिहिली. आज मनुस्मृती सर्वसामान्य समाजाला न्याय न देणारी म्हणून आपण ती नाकारतो. पण समाजाच्या शिस्तशीर चलनासाठी नियम बनवले पाहिजेत. ह्या जाणीवेने टाकलेले हे पहिले पाऊल. इतकेच त्याचे ऐतिहासिक महत्त्व आज उरले आहे. वसिष्ठमुनींनी तपाचरण केले ते मंदिर इथे आहे. राजा जनमेजयाने पिता परिक्षितच्या स्मृती प्रित्यर्थ ४००० वर्षांपूर्वी ते बनवले असे मानले जाते. गंधक व सिल्का मिश्रित गरम पाण्याचे झरे तिथे आहेत.
 वेदपूर्वकालीन, वेदकालीन काळाचे अवशेष स्मृती रूपाने विखुरले आहेत. भारतात आर्य नैऋत्यकडून आले असे काही प्राग्इतिहास तज्ज्ञांचे मत आहे.
 ...त्या खोलात फारसे न शिरता या भूमीला देवभूमी म्हटले जाते हे महत्त्वाचे. कारण इथली भूमी अत्यंत सुपीक, पेराल त्याला भरभरून उगवण शक्ती देणारी. अथक श्रम करून डोंगरात मक्याची कणसे, गहू, तांदुळ, तऱ्हेतऱ्हेची कडधान्ये, भाजीपाला पिकवून समृद्ध जीवन जगणाऱ्या कष्टकऱ्यांची भूमी आहे. म्हणून देवभूमी आहे.

११६ / रुणझुणत्या पाखरा