पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 थंडीचा काटा अंगावर फुलत जातो. दोन दोन दुलया पांघरून गुडुप्प झोपून जावंसं वाटतं. त्यातूनही ती दुलई आईच्या नाहीतर आजीच्या तलम सुती लुगड्याची असावी. बिच्चारा सूर्य, त्याला कुठली अशी मायेची दुलई? सकाळी सहा वाजताच कुडकुडत तो क्षितीजावर गुलाबी किरणांचा शेला पसरू लागतो. त्या गंधगार थंडीला गंध असतो पिकलेल्या बोरांचा. गाभुळलेल्या चिंचेचा. पाणी गोड गोड करणाऱ्या टप्पोर आवळ्यांचा. पिवळ्या तजेलदार पेरूंचा. अमृततुल्य सीताफळांचा.
 मार्गेसरी संपत येते. मार्गशीर्ष अमावस्येचे... वेळा आवसेचे वेध मराठवाड्यातील विशेष करून बीड, उस्मानाबाद, लातूर परिसरातील सर्वांना लागतात. सर्व जातीचे सर्व धर्माचे सामान्य या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. चार दिवसांपासून धपाटे, चटण्या भाज्यांची चव घरादाराच्या जिभेवर हुळहुळायला लागते. शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब दशम्या, धपाटे, तऱ्हेतऱ्हेच्या चटण्या, दही घेऊन शेतात जाते. एखाद्याला जेमतेम एकर दीड एकर शेत असो वा एखादा पंचवीस एकर पाणभरत शेतीचा बागाईतदार मालक असो. किंवा तो नामदार खासदार असो वा एखादा साधा शिपाई असो. तो शेतात जाऊन, आंब्याच्या सावलीला बसून घरच्यांच्या मित्रांच्या सोबत दशम्या, धपाटे, मिरचीच्या खुड्यासोबत खाणारच! अनेकजण शेतात जाऊन अन्न शिजवतात. ज्यांना शेत नाही त्यांना शेजारपाजारच्या कुटुंबांना शेतात जेवायला येण्याचे आमंत्रण दिले जाते आणि हे आवतन चुलीला असते. या जेवणात दशम्या आणि धपाटे

रुणझुणत्या पाखरा / ११७