पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुल्लूरिये पठवाडी ये, नामा शिमले जाना
जेची संग नही तोलना, जेचिये इलायची दाना

 कुलूहून मला शिमल्याला घेऊन जा. मी जणू तुझ्या जीवनातला वेलचीचा दाणा आहे. मला छान पट्टू ...शाल आण. ही शाल सुंदर फुलांनी विणलेली आणि लांब रूंद असते. महिला ती विशिष्ट पद्धतीने पांघरतात. माथ्यावरच्या रूमालाला टिकल्या लावलेल्या असतात. त्या कपाळावर येतील असा रूमाल महिला बांधतात. दागिनेही खूप घालतात. मंगळसूत्राला 'काच' म्हणतात. काळ्या रंगाच्या मण्यांचे १५/२० सर एकत्र गुंफतात. मध्यात रिठ्याच्या बीजाच्या आकाराचे तीन सोन्यांचे मणी असतात. सवाष्णीच्या मृत्यूपर्यंत ती ते गळ्यात घालते.
 आम्हाला नृत्य शिकविणाऱ्या महिलांनी त्यांचे पोषाख व दागिने आणले होते. ते घालून आम्ही फोटो काढले.

डोलमा मॅडमा चाल घरपे, झांजकी बेला (सांज की) चाल घरपे ।
डोलमा शोरी शोरे सजधजके निकले, बेटी का बापूनी लागी डरे
झांज की बेला चाल घरपे...
(शोरा म्हणजे छोरा. शोरी म्हणजे छोरी.)

 या गीताची चाल पहाडी धुनमध्ये होती. भारतीय संगीतात 'पहाडी' ही स्वतंत्र, अनवट अंगाने गायली जाणारी मधुर रागिणी आहे. नृत्याची लय आणि पावले लोकनृत्याची होती. आम्ही सगळ्याजणी वय विसरून मुक्तपणे नाचलो.
 कुलूच्या टोप्या आणि शाली ही त्यांची खासियत. मण्यांची कशिदाकारी केलेल्या सुंदर पर्सेस, लिची, चेरी... ही खरेदी हवीच. कुलू परिसरातील सुमारे तीस हजार महिला या कामातून रोजीरोटी मिळवतात. त्रिशला या विणकर केंद्रातून जाकिटे व शालींची खरेदी केली. मणीकर्णला भेट दिल्याशिवाय कुलू मनाली प्रवासाची सांगता होत नाही. मणिकर्ण कुलूहून ४५ किलोमीटर्स दूर आहे. पार्वती नदीच्या तीरावर मणीकर्ण आहे. एक दिवस जगन्माता पार्वती जलक्रीडा करीत होती. तिच्या कानातला मणी पडला. तो मणी काय साधा सुधा? साक्षात् रत्नमणी. तो तेजाच्या प्रभावाने थेट शेषनाग. जो रत्नांचा स्वामी त्याच्याकडे जाऊन पोचला. शंकररावांनी आपल्या गणांना तो मणी शोधण्याचा आदेश दिला होता. पण त्यांना तो कसा सापडणार? शिवजी चिडले आणि तिसरा डोळा उघडला. मग काय? प्रलय सरू झाला. नागराजांनी घाबरून तो मणी फुत्कार टाकून पृथ्वीवर फेकला. त्या फुत्कारामुळे गरम पाण्याचे झरे मणीकर्णमध्ये वाहू लागले. या गरम पाण्यात न्हाले तर सांधेदुखी, पोटाचे आजार कमी होतात असे

रुणझुणत्या पाखरा / ११५