पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 रोहतांगच्या खिंडीतून मन खाली उतरायला तयार नव्हतं. हवामान चांगले असल्याने श्वास घेण्यास त्रास झाला नाही. बाकी सगळे बर्फात खेळण्यात धुंद होते. आमच्या छोट्या इंडिकाने लवकर काढता पाय घेतला. कोठीहून ज्या महिलांकडून फरचे कोट व बूट घेतले, त्यांच्याशी गप्पा मारायच्या होत्या. आईचे नाव होते माधुरी. ती असेल चाळिशी ओलांडलेली आणि तिची मुलगी इंद्रावती. ती बाविशीची. तिचा पती बॉर्डरवर खबरेगिरी करी. अतिरेक्यांच्या हल्ल्यात तो ठार झाला. दोन मुलांना घेऊन इंद्रावती आईच्या आधाराने वेगळे घर करून राहते. माधुरीचा नवरा सफरचंदाच्या बागेत काम करतो.
 सोलांग व्हॅली हा एक देखणा परिसर. याची उंची दोन हजार चारशे ऐंशी मीटर आहे. येथे गाड्या ठेवण्यासाठी मोकळी जागा आहे. तिथे गाडी थांबवली आणि एका विशाल वृक्षाखाली बांधलेल्या चौथऱ्यावर आम्ही थोडे विसावलो. आम्हाला पाहून दोन कुलूस्त्रिया आमच्याजवळ आल्या. येताना एका मैदानात स्त्री पुरुष पारंपारिक गीतावर नृत्य करीत होते. आम्ही तिथे पोचण्या आधीच कार्यक्रम संपला. मनाला रूखरूख लागली. या महिला आम्हाला गाणी आणि नृत्य शिकवायला तयार झाल्या आणि आम्हीही त्यांच्या सोबत नाचू लागलो. अनुष्का आणि रेवती दोघी भरतनाट्यम् शिकतात. त्यांना पावली (स्टेपिंग) लक्षात ठेवायला सांगितले. कुल्लई भाषेतले गीत गात त्या नृत्य करू लागल्या.

११४ / रुणझुणत्या पाखरा