पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेढलेले. त्यामुळे इथून सीमा ओलांडताना अनेकदा जीव गमवावा लागे. आता शासनाने खूप सुधारणा, सोयी केल्या आहेत. मनालीच्या दिशेने नजर टाकली की घनघोर जर्द, गर्द हिरवाई दिसते आणि दुसरीकडे वनस्पती विहीन हिमपहाड. इथे झीरोपॉईंटवर व्यास नदीचा उगम आहे. लोकभाषेत तिलाच बियास म्हणतात. इथून तिबेट व चीनमध्ये घुसता येते...
 ...आणि मला वयाची मर्यादा इथे जाणवली. भरपूर चालण्याची. धावण्याची शारीरिक क्षमता असेपर्यंत इथे यायला हवे. बर्फावरून ढकलत नेणाऱ्या लाकडी गाड्या होत्या. झिरो पॉईंटपर्यंत, व्यास नदीच्या उगमापर्यंत नेऊन आणायचे पाचशे रुपये. थोडी घासाघीस केली. त्या ढकलगाडीत दोन जण बसू शकतात. मी आणि माझा मुलगा अभिजीत आम्ही दोघे बसलो. चढावावर तीन जण ढकलत होते. भवताली मुले, नातवंडे बर्फातून उंडारत होती. एकमेकांच्या अंगावर गोळे करून फेकत होती. मी तो आनंद तीसवर्षे मागे जाऊन मनानेच झेलत होते. पण नंतर खाली उतरलेच. बर्फाचे गोळे फेकण्याचा, बर्फाच्या चुऱ्यावर जाड कोट, लोकरी टोपी घालून फतकल मारून बसण्याची धम्माल अनुभवली. अशा वेळी 'त्या'ची याद आलीच. मी हिंडण भवरी तव हा मातीत पाय घट्टपणे रोवून समर्थपणे उभा असलेला स्वयंसेवी सैनिक. पण त्याने माझ्या हिंडण्याला कधीही अडसर घातला नाही. शेवटी साथ त्याचीच!

रुणझुणत्या पाखरा / ११३