पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रवास हिमालयाच्या काठाने होता. उंच उंच बर्फाळ हिमशिखरे, त्यावर पडणारे ऊन, त्या शुभ्रतेवर सोनसळी झळाळी. डोळे तृप्तीने तहानले होते. तेव्हाच ठरवलं या जन्मी हिमालयाच्या कुशीत एकदातरी विसावयाचेच!...
 मनालीला पोचलो आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी साडेसात वाजता रोहतांग पासला निघालो. पुन्हा निरूंद रस्ते. डोंगर फोडून जेमतेम एक गाडी येऊ जाऊ शकेल असे. हा रस्ता बॉर्डर सिक्युरिटी फोर्स - सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी... जवानांनी तयार केला आहे. त्याची निगा तेच राखतात ठराविक अंतरावर रायफलधारी जवान येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे बारकाईने निरीक्षण करीत असतात. शंका येताच गाडी थांबवतांत. गाडीची कागदपत्रे, परवाना इत्यादीची कसून पाहणी करतात. कोठीपासून जेमतेम २७/२८ किलोमीटर्स अंतर. पण पंधरा ते वीस अंशाच्या कोनात वळणारे रस्ते... हेअरपिन ड्राइव्हज्. चढणीचा रस्ता. ज्या रस्त्यावरून आपण आलो ते रस्ते खेळातल्या नागमोडी रेषांसारखे नि त्या वरून धावणाऱ्या गाड्या आगपेट्यांच्या. आकाराच्या, दिसत होत्या. आम्ही हिमगिरी बर्फाच्छादित रांगांमधून प्रवास करीत होतो.
 रोहतांग पासला बर्फात खेळण्यासाठी जाड वुलनचे... फरचे कोट, बुट घ्यावे लागतात. ते ७० ते १०० रुपये भाड्याने मिळतात. त्या दुकानांना नंबर्स असतात. आम्ही पंधराजण होतो ७० व १७१ या दुकानांतून कोट घेतले. दुकानातील सर्व व्यवहार महिलाच पाहतात. यांचे पती सफरचंद, लिचीच्या बागांतून मजुरी करतात. ते स्वतःला राजपूत मानतात. कोठी हे रोहतांगच्या अलिकडचे गाव. तिथेच ही दुकाने आहेत.
 पाहता पाहता आम्ही इतके उंचावर आलो नि लक्षात आले की काही बर्फाळ शिखरांपेक्षाही आम्ही उंचावर होतो. गोठलेले झऱ्यांचे प्रवाह ऊन पडल्यामुळे मधूनच वितळून झुळझुळती बारीकशी पाणरेषा उड्या घेत वाहात होती. इतक्यात एक विलक्षण दृष्य दिसले भला मोठा प्रवाह गोठून बर्फाचा पांढरा रूंदबंद दगड पायथ्याशी येऊन थांबला होता आणि त्या दगडाच्या खालून वितळलेले पाणी झुळझुळत होते. डोंगराच्या बाजूने खणून प्रवाहाला वाट करून दिलेली आहे. त्यामुळे पाणी रस्त्यावर येत नाही आणि एका अतिउंच टप्प्यावर गाडी थांबली.
 आता आम्ही समुद्र किनाऱ्यापासून सुमारे १३५०० फूट (३९३४ मीटर) उंचीवरच्या भारताच्या शेवटच्या बिंदूवर रोहतांग पासवर पोचलो होतो. समोर दाट बर्फाच्या चुऱ्याचे लांब रूंद मैदान. किंचित चढणीचे. रोहतांगचा अर्थ मुडद्यांचे गाव. इथून लेहकडे जाता येते. इथले हवामान नेहमी बदलत असते. हिमवृष्टी, वादळे यांनी

११२ / रुणझुणत्या पाखरा