पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ढब्बू मिरच्या यांनी सजलेली भाजीची दुकाने दिसू लागली. मनात खूणगाठ बांधली. आज दालफ्राय आणि छोले सोडून चमचमीत भाजीही खायला मिळणार.
 ...आमची गाडी दुपारी दीड वाजता मनालीच्या हॉटेल विंटेज कॉटेज समोर थांबली. खोलीत प्रवेश केला आणि डोळ्यांचे पारणे फिटले. खोलीच्या काचेरी खिडकीतून बर्फाने व्यापलेली शुभ्रांकित हिमशिखरे. त्यांना वेढून असलेले हिरवेजर्द उंच डोंगर, त्यातून वेगाने धावत खाली येणारे फेसाळ... खळाळते पांढरे शुभ्र झरे साद घालत होते. मी चित्रातल्या नव्हे तर खऱ्याखुऱ्या हिमालयाला नजरेत साठवीत होते. उद्या तर हिमालयाच्या कुशीत खेळायला जायचे होते...

११० / रुणझुणत्या पाखरा