पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोडलेला, अशा वेशातल्या महिला गटागटाने फळबागांमध्ये फळे गोळा करायला जाताना दिसल्या. सगळ्यांचे चेहेरे तरतरीत. ताजेतवाने. गोरी झळझळीत कान्ती. त्यांची घरे डोंगरातच. घरापासून मुख्य रस्त्यावर यायला चिमुरड्या उतरत्या पायवाटा आणि आमच्या गाड्या थांबल्या. "कुल्लू प्रदेशमें हम आपका स्वागत करते है" असा बोर्ड होता आणि लगेच बोगदा.

कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी

 असे म्हणत लहानपणी आम्ही मुंबई पुणे प्रवासातले बोगदे पार करीत असू. त्याची आठवण झाली पण हा बोगदा खूपच लांबलचक... चक्क तीन किलोमीटर्स लांबीचा होता.
 ...अचानक रेशमी उन्हाच्या कवडशांनी आमचे सुनहरी स्वागत केले. आम्ही कुलू खोऱ्यात होतो. चमचमणारी शुभ्रांकित हिमशिखरे आम्हाला खुणावत होती.
 बोगदा येण्याआधी एक सुंदर चिमुकले धरण लागले. ते पंच नद्यांपैकी बियास या अवखळ नदीचे होते. आमचा पुढचा प्रवास तिच्या साथीने सुरू झाला. कुल्लू ते मनाली हे एकावन्न किलोमीटर्सचे अंतर. पण ते कापायला तीन तास लागले. चढणीचा निरूंद रस्ता. एका खालचे एक असे दहा बारा रस्ते सहजपणे दिसत होते. एकामागे एक उभ्या असलेल्या डोंगर रांगा. त्या पार करीत हिमशिखरांचा पल्ला आम्हाला गाठायचा होता. इतक्यात एक गौरांगना चेरी आणि स्ट्रॉबेरीचे द्रोण घेऊन उभी होती. अर्थात सगळ्यांनीच ते द्रोण विकत घेतले. लिची हे, बोर आणि करवंद यांच्या मध्यातले देखण्या लाल... पिवळट रंगाचे चकचकित फळ. चव अत्यंत मधुर. आंबट आणि गोड यांच्यातले माधुर्य त्यात साठलेले असते. बीजही मऊ. स्ट्रॉबेरीचे आवरण काहीसे खडबडीत फणसाची बाळआवृत्ती. वरचे आवरण काढले की आतला मगज कोकणातल्या ताडगोळ्यासारखा आरस्पानी. चव मात्र गोड... मधुर.
 एका बाजूने सतत खोल दरी असणारा घाट तो पाहून मला धुळ्याला जाताना लागणारा कन्नडचा औट्रमचा घाट आठवला. त्यांची लांबी ७ किलोमीटर्स आहे. तो पार करतानाही छातीचा ठोका चुकतो. चक्रधराची (ड्रायव्हरची) हात चलाखी महत्त्वाची ठरते. पण हा तर औट्रम पेक्षा पन्नास पटीने मोठा घाट आणि त्याहून अवघड आणि दुपारी एक वाजून गेल्यावर आम्ही एकदाचे मनालीत पोचलो. भलीमोठी ताजी जांभळी वांगी, दीडदोन फूट लांबीचे रसदार शुभ्र मुळे, तोंडात पाणी आणणारी लांब सडक केशरी रंगाकडे झुकणारी गाजरे, लालबुंद टोमॅटो, काकड्या, हिरवाकंच पालक, कोथिंबीर,

रुणझुणत्या पाखरा / १०९