पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 मेहमुद रफी आणि त्यांची हिंदू पत्नी मीना उर्फ अमीना यांच्या कुटुंबात जोपासलेल्या मराठी माणसांविषयीच्या तुडुंब आपुलकीने भरलेला पाहुणचार घेऊन रात्री साडेबारानंतर आम्ही पंचफुला हे हरियाना... पंजाबच्या सीमेवरचे गाव सोडले. रफीजी महाडचे तर अमीना नागपूरची. त्यांना एक गोड मुलगी आहे. शबाना नावाची. रफीजींनीच आम्हाला एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक इंडिका अशा दोन गाड्या ठरवून दिल्या होत्या. कुलू खोरे इथून सुमारे २८३ किलोमीटर्स होते. रात्रीच्या झोपेचा झपका डोळ्यावरून दूर झाला तेव्हा बाहेर चांगलेच उजाडले होते. घड्याळात पाहिले तर लहान काटा पाचावर नि मोठा बारावर. अत्यंत निरूंद रस्त्यावरून आमच्या गाड्या वेगाने धावत होत्या. आपण किती उंच चढून आलो आहोत हे जाणवून क्षणभर हृदयात लकलकलेच आणि आमचे निष्णात चक्रधर राजेश आणि हरिओम् यांना थ्री हॅटस् ऑफ म्हणत सलामी द्यावीशी वाटली. मनात आले. त्यांची नजर क्षणभरही विचलित होऊन ढळली असती तर?
 रस्त्याच्या एका बाजूला खोल...खोल...खोल... दरी. हिरवाईने बहरलेली. तर दुसऱ्या बाजूला चढता डोंगर चिनार, सुरू, देवदार या उंचउंच निमुळत्या वृक्षांनी वेढलेला. अधून-मधून सफरचंद, लिची, चेरी, स्ट्रॉबेरी या फळांच्या बागा. पाठीला निमुळत्या आकाराच्या बांबूच्या टोपल्या बांधून, माथावर कपाळावर येणारी, टिकल्यांची... माळांची झालर लावलेली ओढणी बांधून मागे तिचा शेव... पदर

१०८ / रुणझुणत्या पाखरा