पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करीत.. अंगप्रदर्शन करणाऱ्या सर्व वयाच्या स्त्रिया. बीचवरून हिंडणारे गोरे.. परदेशी म्हातारे. लगटून चालणारी १२/१४ ची उमलती कळी. म्हातारे हात तिच्या अंगाशी खेळणारे आजही आठवण झाली तरी तो किनारा 'बाई' असण्याचे दुःख जागे करून अशांत... अस्वस्थ करतो आणि करीत राहील. थायलंडमध्ये जागोजागी मर्दन केन्द्रे (मसाज सेंटर्स) आहेत. आणि ही कला शिकवणारी 'विद्यापीठे' आहेत. 'विद्यापीठे' या शब्दाचा वेगळा अर्थ कळला. हा स्त्रियांचा महत्वाचा व्यवसाय आहे. तीन शिफ्टमध्ये.. एकावेळी ६० ते ८० महिला हा व्यवसाय करतात. या चिमुकल्या, तीनही बाजूंनी सागराने वेढलेल्या देशातील जमीन परदेशी लोकांनी विकत घेतली. पुरूष मजूरी करतात. बस चालवण्यापासून ते क्रेन ओढण्यापर्यन्त सर्वत्र स्त्रियाच पुढे असतात. भाषेवर संस्कृत.. भारतीय भाषांचा प्रभाव जाणवतो. तर मर्दन केन्द्रातील स्त्रियांशी संवाद साधतांना कळले की त्या हा घरंदाज मानला जाणारा व्यवसाय मुलांचे शिक्षण, चरितार्थासाठी आणि 'डॉवरी' ची .. हुंड्याची रक्कम जमा करण्यासाठी करतात. मर्दन करून घेणारे मात्र पुरूषच असतात. पण तेथे अश्लिलता कुठेही न येऊ देण्याचे बंधन पाळले जाते. तेलाचा वापर न करता मर्दन केले जाते. या कलेला दूषित वा अप्रतिष्ठित मानले जात नाही. म्हणून ही 'कला' नव्हे तर 'विद्या' मानली जाते.
 ...पटाया किनाऱ्यावर गेलो. लांबच लांब किनारा, कडेला बैठी.. दारे नसलेली हॉटेल्स. तरूणाईत पाऊल टाकणाऱ्या ॲडोलसन्ट.. अधमुऱ्या दह्यासारख्या गोंडसमुली. पण डोळे निष्णात. चेहेरे रंगवलेले. मंद दिव्यांच्या उजेडात एकेक टेबल पकडून हवे असलेले भरघोस खिसा भरलेले भक्ष धांडोळणाऱ्या त्या मुली. लोभस भक्ष शोधणारे प्रौढ.. वृद्ध आंबटशौकीन परदेशी पुरूष....
 लहानपणी वाचलेल्या कवितेतली गौळण म्हणाली होती
 माय फेस इज माय फॉरच्यून... अगदी २१ व्या शतकात प्रवेश करतांनाही आमच्या देहाला, चेहऱ्यालाच महत्व? आम्हाला भवितव्य नाहीच? आमच्या उज्वल भवितव्याला शक्ती देणारा आमचा चेहेराच? आता अगदी चित्रातला समुद्र पाहिला तरी मनात येते पटायाचा किनारा २१ वे शतक सुरू होऊन सातवर्षे झाली तरी तसाच असेल का? उमलत्या कलिकांच्या मनातले स्वप्नांचे गर्भ खुडून त्यांच्या देहांचा मांडलेला बाजार रात्रंदिवस पाहणारा हा समुद्र आतल्या आत गुदमरत नसेल ?..?

रुणझुणत्या पाखरा / १०७