पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समुद्र न्याहाळता येतो असे ठिकाण म्हणतात. आम्ही ते आवर्जुन पाहिले. चढती संध्याकाळी. मला त्या कोळिणींचे आतुर डोळे, कातर मन दिसलेच. अन् लता दिदींचे सूर आठवले-

माझ्या सारंगा.. राजा सारंगा
डोलकरारं..धाकल्या दिरा रं
चल जाऊया घरा...

 व्यवसायाशी जोडलेल्या वेदना.. भावना कुठेही गेलात तरी सारख्याच ना?
 ...१९९३ च्या भूकंपात सकाळी नऊलाच मानवलोकचे कार्यकर्ते मूव्ही कॅमेरा घेऊन किल्लारीत पोचले. पहिला फोन डॉ. जगन्नाथ वाणींचा कॅलगरी - कॅनडातून आला. मग फोनच फोन. मानवलोकच्या माध्यमातून जो निधी जमा झाला त्याचा दरमहा अहवाल, हिशेब पाठवला जाई. प्रत्येक दिवस नवे प्रश्न.. नवे आव्हान उभे करणारा. आमची दोन केन्द्रे पारधेवाडी (लातूर) व सालेगाव (उस्मानाबाद) इथे तंबू ठोकून उभी राहीली. फेब्रुवारी १९९४ मध्ये आम्हा दोघांना कॅनडा व अमेरिकेतील मित्रांनी आम्ही तयार केलेल्या माहितीच्या चित्रफितीसह तिथे येण्याचे निमंत्रण दिले. अर्थातच आम्ही गेलो. उभय देशांतल्या २३ गावांना भेटी दिल्या. तिथल्या भारतीयांशी संवाद केला. आणि अटलांटिक महासागराप्रमाणे पॅसिफिक महासागराचेही प्रत्यक्ष दर्शन घडले.
 व्हँकुव्हर हे पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरचे गाव. अशोक कोतवाल त्यांची पत्नी ट्रुस यांच्यासह त्या किनाऱ्यावर गेलो. भरतीची वेळ. समोर भरतीच्या लाटांनी उधाणलेला समुद्र आणि नव्या सागर स्पर्श-दर्शनाच्या ओढीने उफाणलेला आमचा उत्साह. गाडी पार्क करतांना मशिनमध्ये नाणे टाकून नोंदवायला अशोक विसरले. जेमतेम पंचवीस पावले पुढे गेलो असू. लक्षात आले आणि ते गाडीकडे धावले. पण नियमाचे उल्लंघन केल्याबद्दलच्या दंडाची रक्कम नोंद करून उद्या सकाळी १० पर्यंत रक्कम जमा करण्याची सूचना गाडीला चिटकवलेली होती. अशोक दोन मिनिटात येतो सांगून गेले आणि दंड भरून हुश्श करीत आमच्यात सामिल झाले आणि पॅसिफिक सागरही मनात नोंदवला गेला.
 १९९५ मध्य बीजिंगच्या जागतिक महिला परिषदेला जाण्याचा योग आला. येतांना बँकॉक आणि स्त्री देहाचा बाजार मांडून बसणारी, पटाया नगरी यांनाही भेट दिली. पटायाच्या बीचवरची संध्याकाळ प्रत्यक्ष पाहिली. मेणबत्ती सारखे मिणमिणते दिवे. अंधारलेली कॉफी, दारूची दुकाने. टेबला शेजारी नटूनथटून बसलेल्या. खुणा

१०६ / रुणझुणत्या पाखरा