पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आता आम्ही 'झीरो' या शहरवजा गावाकडे निघालो होतो. झीरोला जातांनाही आसामला जावेच लागते. नॉर्थ ईस्ट म्हणजे नैऋत्य दिशेच्या भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या सातबहिणी-सेव्हन सिस्टर्स फार मोलाच्या आहेत. अरुणाचल, मिझोरम, नागालँड, मेघालय, मणीपूर, त्रिपुरा आणि आसाम या त्या बहिणी, आसामला तर 'पाम ऑफ द नॉर्थ ईस्ट' नैऋत्यचा तळवा असे म्हणतात. अरुणाचल हे सर्वात वरचे... नैऋत्येचे टोक. सीमे पल्याड महाकाय चायना... चीन आहे. पश्चिम टोकाकडे तिबेट आहे. कामेंग, तावांग जिल्ह्यांना जोडून भूतान आहे. आणि पश्चिमेकडच्या तिरप, चँगसँग जिल्ह्यांना म्यानमार उर्फ ब्रह्मदेशाची सीमा जुळलेली आहे. म्हणजे अरुणाचलच्या सीमा चार परकीय राष्ट्रांशी लगटून आहेत. सततची आक्रमणे, लढाया हा हजारोवर्षांचा परिपाठ अरुणाचलातील विविध भाषी आदिवासी जमातींनी सोसला आहे. त्यांना 'हेड हंटर्स' म्हणणे हा त्यांनी शौर्याने केलेल्या सीमारक्षणाचा अधिक्षेपच होईल.
 अरुणाचलचे जिल्हे म्हणजे हाताची बोटे. कोणत्याही एका बोटाकडून दुसऱ्याकडे जायचे तर तळ्यावर उतरावेच लागते. पूर्वी पाच जिल्हे होते. आता ती संख्या तेरावर पोचली आहे. या सात बहिणींच्या जीवनरितीतही खूप सारखेपणा आहे. प्रत्येक घरात वजनाने हलका हातमाग असणारच. प्रत्येकाला वस्त्र विणता येते. त्यातही स्त्रिया विशेष निपुण. पाऊस चाळीस ते अडिचशे इंचापर्यन्त कोसळणारा. त्यामुळे घनदाट जंगलांचा प्रदेश तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पतींनी आंगोपांगी बहरलेले डोंगर. नजर टाकावी तिथे झरे, पाणी... वेगाने धावत, उड्या घेत उताराकडे झेपावणारे.

१०२ / रुणझुणत्या पाखरा