पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सूर्यकिरणे ज्या पर्वतराजीवर पावले टेकतात तो अरूणाचल, म्हणून येथे काम सुरू केले. आज संपूर्ण अरूणाचल विवेकानंद केन्द्रे, रामकृष्ण मिशन, माँ शारदा मिशनच्या मुलामुलींच्या शाळांनी व्यापलेला आहे.
 ... तर त्या मेखलेवर येथील महिला पाठपोट झाकणारे लांब रंगीत पोलके घालतात. त्यावर सुरेख जॅकेट असते. केसांचा अंबाडा आणि त्यावर डोके झाकणारा रेशमी रूमाल बांधलेला. पुरूषांच्या पोषाखात विजार आली. पण भारतातील स्त्रियांच्या

पोषाखातील विविधता अजूनही जोपासलेली आहे. तिचे नाते त्या परिसरातल्या निसर्गाशी आहे.
 या वेशातली जॉर्जुम एत्ते गेल्या १५/२० वर्षांपासून आम्हाला भेटते. स्त्रियांचे 'माणूसपण' समाजाने समजून घेऊन मान्य करावे, यासाठी नम्रपणे संघर्ष करणाऱ्या संघटनांच्या राष्ट्रीय बैठकीत ती असतेच. यावेळी 'नावो' ची बैठक तिने आयोजित केली. म्हणून ही संधी.
 भारताचे रक्षण करणाऱ्या ईशान्य सीमेवरच्या सप्तभगिनी - सेव्हन सिस्टर्स पैकी एक अरुणाचल. याच्या चार सीमा चीन, भूतान, तिबेट, म्यानमार ऊर्फ ब्रम्हदेशाशी जोडलेल्या. तर दक्षिणेकडे आसाम, नागालँड हे भारतीय प्रदेश. इथे पावसाची सरासरी चाळिस ते दोनशे इंच. उंचावरून उड्या घेत थरार धावणाऱ्या नद्या, घनदाट जांभुळ हिरवी अरण्ये. अरुणाचल चे देखणे निसर्ग सौंदर्य डोळ्यांना तहानलेले ठेवणारे. दुसऱ्या दिवशीची बैठक 'झिरो' नावाच्या दक्षिण सुबनसरी जिल्ह्यातील आपातानी पठारावर वसलेल्या अगदी गोंडस, चिमुकल्या गावात होती. तिथे अरुणाचलमधील महिला येणार होत्या. त्यांचे प्रश्न मांडणार होत्या. पहाटे सहाला निघायचे होते. खरा अरुणाचल येत्या दोन दिवसांत डोळे भरून पहायचा होता. दोन दिवस कमीच होते.

रुणझुणत्या पाखरा / १०१