पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हैद्राबाद, राजस्थान, नागपूर, गुजराथ, अमृतसर इत्यादी प्रान्तातून... शहरातून वीस जणी आल्या होत्याच. त्यात आमची भर.
 गोहाटीतून सुमोतून चढता प्रवास. भारताच्या ईशान्येकडे... अति पूर्वोत्तरेकडे जिथे उगवत्या अरूणाची पहिली किरणे झेलली जातात त्या हिमालयाच्या पठारावरच्या प्रदेशाकडे...अरूणाचलकडे आम्ही सुसाटलो होतो. गच्चकन् सुमो थांबली. रात्रीचे बारा वाजून गेले होते. आम्ही इटानगरमध्ये होतो.
 खोलीत हीटर होते. अंगात गरम कपडे. तरीही दुलई, ब्लँकेटमधून बाहेर येण्यास मन धजावत नव्हते. पण साडेनऊला विवेकानंद केन्द्रात बैठक सुरू होणार होती. सकाळी नऊ वाजता रस्त्यावर उतरलो. भवताली निरभ्र प्रकाश. रस्त्यावरून येणारी जाणारी चपट्या नाकाची. चिमण्या डोळ्यांची पिवळसर गोऱ्या रंगाची हसरी माणसे वावरत होती. आसाममध्ये स्त्रिया कमरेला लुंगीसारखे वस्त्र गुंडाळतात. त्याला मेखला म्हणतात. येथील महिलांच्या अंगावर मेखलाच होत्या. त्या सुतीच होत्या. परंतु त्यांची वीण अधिक घट्ट, दुहेरी होती. अरूणाचल जंगलांनी विविध प्रकारच्या वनस्पतींनी समृद्ध असलेला, हजारो वर्षांपासून विविध भाषा बोलणाऱ्या सुमारे २९ अदिवासी जमातींचा, ३१ हजार चौरस मैलांचा हिमालयातला डोंगराळ प्रदेश आहे. पूर्वी काही आदिवासी जमाती 'हेड हंटर्स' होत्या असे म्हटले जाते. परंतु अदिवासी नसलेल्या, शिक्षित... अभ्यास करणाऱ्या व त्यांच्याशी मित्रत्व, भारतीयत्वाचे नाते जोडण्यास गेलेल्या लोकांनी त्यांच्याशी प्रेमाचे नाते बांधले. मग कळले की या जमातींवर आक्रमणे सतत होत असत. युद्ध हे नित्याचे बनले. शत्रूला मारणे म्हणजे विजय. स्वतःच्या विजयाची गाथा, मारलेल्यांची मुंडकी, कवट्या ओळीने लावून, जमवून निरक्षर आदिवासींचे पूर्वज लिहित. आज ते इतिहासात जमा झाले आहे.
 ...तर काय या आदिवासींचे वनस्पतीबद्दलचे अनुभवाधारित ज्ञान विपुल, विशाल आहे. वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांनी रंगलेले यांचे कपडे. फाटले तरी रंगांची चमक जिवंत ठेवणारे असतात.
 ...भाकरी हाच भुकेल्यांचा परमेश्वर असतो हे सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या 'हिंदू' या शब्दातील विशाल आणि सखोल व माननीय भूमिकेवर नितान्त निष्ठा असणाऱ्यांनी पस्तिस वर्षांपूर्वी या प्रदेशात शिक्षणाच्या माध्यमातून सांस्कृतिक एकात्मतेचा ध्यास... अभ्यासाची भूमिका घेऊन पाय रोवले. एकनाथजी रानडेंनी विवेकानंदांचे कन्याकुमारीतील स्मारक ज्या ठिकाणी त्यांना एकात्म भारतीयत्वाची मनोभूत... अंगभूत जाणीव झाली तेथे उभारले आहे. भारताचे उत्तरेचे टोक, पहिली

१०० / रुणझुणत्या पाखरा