पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 घनदाट हिरव्याकंच झाडांच्या मध्यातून आमच्या चार सुमो आणि एक मिनीबस सुसाट वेगाने धावत होत्या. खरे तर घड्याळाच्या काट्याने नुकतीच साडेचारची रेषा ओलांडलीय. पण भवतालच्या झाडांच्या सावल्या गर्द होत जाणाऱ्या पहाता पहाता झाडं आणि सावल्या अंधारात बुडून गेल्या. मधूनच एखादे गाव..., खेडेच म्हणाना पार होई. पाऊस झेलणाऱ्या उतरत्या झोपड्या. आत एखादाच मिणमिणता दिवा. गोहाटी सोडून दोन तास उलटून गेले होते. काकडवणारी थंडी गाडीच्या काचेला न जुमानता आत येत होती. आता बहुदा डोंगरपहाडातून आमचा प्रवास सुरू झाला असावा. मधूनच धडडम् ... खडड्म असा आवाज येई, पत्र्यावरून दणाणा पळत जावे तसा. कर्कश... काटेरी. मग मनात भीती. उल्फा, नागा वगैरेंची.
 पंधरा दिवसांपूर्वी शारदाचा मुंबईहून फोन आला होता. की नावो-नॅशनल अलायन्स ऑफ विमेन्स ऑर्गनायझेशनची बैठक अरूणाचलला आहे. परवापर्यन्त माझे तिकिट काढण्याबद्दल कळवायचे होते. बैठक इटानगरला होती. फोन ऐकताच मी मनातल्या मनात टुण्कन उडी मारली. हो, पासष्टी पार केली तरी! माझी आजी मला "हिंडणभंवरी" म्हणायची तर, "पायाला चाकं बांधून घे" असे आई म्हणे. प्रवासाची हौस भाझ्या रक्तात भिनलीये!
 ... सकाळी सातला इमायनातला पट्टा कमरेभोवती आवळला. तो सोडत, पुन्हा बांधत दुपारी दोन वाजता कलकत्ता मार्गे गोहाटीला सुखरूपपणी उतरलो. चेन्नई,

रुणझुणत्या पाखरा / ९९