पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पोचली होती. चक्क तळमजल्यावरचा ब्लॉक हातात घेऊन टाकला होता. मी आपली सहामजले चढण्याची तयारी पूर्णपणे करून आल्याने टुणकन उडीच मारली. प्रत्येकीला नेमकेपणाने तयार केलेली साधी कॉट, स्वच्छ अंथरूण, पांघरूण. एक टॉवेल, सपाता टुथब्रश... छोटा टॉवेल यांची सुरेखशी भेट. चार खोल्यात आम्ही पाचजणी. चोवीस तास गरम नि गार पाण्याचा फवारा. सर्वात स्वस्तातली म्हणजे बारा दिवसांचे ८५० युआन... सुमारे साडेतीनहजार रुपये... अशी 'पंचतारांकित'सोय झाली होती. आमचं रहाण्याचे ठिकाण परिषदेच्या इमारतीपासून सुमारे मैलभर दूर असेल. ३० ऑगस्टला बीजिंगच्या अवाढव्य क्रीडासंकुलात परिषदेचा उद्घाटन समारंभ होता. २९ चा दिवस इकडे तिकडे भटकण्यासाठी आमच्या हातात होता.
 २९ च्या सकाळी रात्री बसमधून अंदाजलेल्या रस्त्यावरून मुख्य स्थळाकडे चालत निघालो. मध्यात मोटारींचा रस्ता. दोन-तीन गाड्या समोरासमोरून ऐसपैस जाऊ शकतील एवढा. कॅनडा, अमेरिका किंवा जर्मनीमधले मोटारीचे रस्ते प्रचंड. एका दिशेने चार नि उलट्या दिशेने चार अशा मोटारी ऐसपैस धावतील तेवढेच मोठे रस्ते सायकलवाल्यांसाठी होते. त्यांच्या पलीकडे चालणाऱ्यांसाठीचा निरूंद रस्ता. हे सगळे रस्ते गुलाब फुलांच्या झुडपांनी आणि सूचिपर्णी जातीच्या वृक्षांनी आखलेले. आम्ही चौघी सायकलरस्ता अडवून गप्पाटप्पा मारीत चाललेलो. समोरून येणाऱ्या सायकलवाल्यांची काहीशी रूखी...रूखी नजर आधी लक्षात नाही आली नि मग एकदम दिवा लागला की आम्ही सायकलरस्त्यावर आक्रमण केलंय. दुसऱ्याक्षणी चीनच्या शिस्तीत फुटपाथवरून जायला लागलो. रस्त्याचे अंदाज बऱ्याचदा हुकतात, आम्ही पण चुकलो. नको तिथे वळलो. मग विचारणं...अजिजीकरणं आलं. पण इथे तीही पंचाईत. भाषा हे संवादाचं माध्यम असते. ते हरवले तर आपण चक्क हरवतो. याचा पहिला अनुभव. सामान्य चिनी माणूस इंग्रजीतला अ की ठ जाणत नाही. मग उपयोगी पडते ती खुणेची भाषा. पण तीही कुणाला समजेना. गळ्यातले परिषदेचे मंगळसुत्र काढून दाखवले तेही कोणाला समजेना. मग मात्र वैतागलो. इथल्या सुटाबुटातल्या दुकानातल्या माणसालाही या परिषदेचा पत्ता असू नये? आता मात्र चीनची भिंत दिसायला लागली. इतक्यात एका हॉस्पिटल सारख्या इमारतीच्या दरवाजातून बाहेर पडलेल्या काही विशिष्ट पोषाखातल्या स्त्रिया दिसल्या. मग तिथे धावलो. त्यातल्या एकीला चुटपुटू इंग्रजी येत होते. चायनी इंग्रजीच्या जंगलातून वाट काढीत चार पावले पुढे जाता आले. पण पुन्हा तिथंही अडकलो. तेवढयात दोन साऊथ अफ्रिकेच्या चुकलेल्या अवाढव्य बायका आम्हाला पाहून धावत आल्या. चारच्या आम्ही सहा झालो. मग पुन्हा पुढे पुढे चालत राहणे आणि अचानक समोरच्या दिशेने बायकांची धावती गर्दी दिसली. कळशी काखेतच होती. आम्ही स्वागत कक्षाच्या अंगणात पोहचलो होतो.

९२ / रुणझुणत्या पाखरा