पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कधी वेळेवर कधी उशिरा, पण लहरी पाऊस येतो. आणि कडक उन्हाने उदासलेल्या जुईच्या... सायलीच्या वेलींवरही पहाटेचा ताजवा खेळू लागतो. सायली जुईच्या वेलीवरही कोवळ्या उन्हात न्हाऊन आलेल्या सायीच्या पांढुरक्या रंगाच्या कळ्या रूमझुमू लागतात. घनघोर पावसात...उधाणत्या वाऱ्यात चिंब भिजत, झुलमझुलत हसत रहातात. जुईची पाने नाजुक, कळ्या... फुलेही नाजुक, इतकी की, श्वासभरून गंध घेतला तर कोमेजून जावीत अशी. दिवस उतरणीला लागला की ह्या वेलीच्या कळ्यांचे डोळे उमलू लागतात.
 ...आठवते ३८ वर्षापूर्वीची संध्याकाळ. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आसपास राहणाऱ्या वसतीगृहातील आम्ही मुली लकडी पुलापर्यंत फिरायला म्हणून निघायचो भांडारकर रोडकडे जाणारा रस्ता सोडून पुढे आलो की जुईचे दुहेरी वळेसर विकणारी लहान मुले समोर गजरे नाचवीत चार आण्याला एक - रुपयाला पाच, ओरडू लागत. पण तेव्हां महिन्याला तीस रुपये जेवणाचे नि वीस रुपये वर खर्चाला अशी पन्नास रुपयांच्या मनीऑर्डरची वाट पहाणाऱ्या आम्हाला 'चार आणे' देणेही जड जाई.
 थंडीचा काटा हवेतून बोचू लागला की वसतीगृहाच्या आवारातली बुचाची उंच उंच झाडे, लांब पुंगळीच्या दांडीवर चांदणी निवाऱ्याला यावी अशी पांढऱ्या रंगाच्या असंख्य फुला-कळ्यांच्या घोसांनी फुलून जात. पानाचे पिसारे जणू मिटवून घेतलेले, या फुलांचा धुंद करणारा मधुरगंध, झाडांचा आभाळाला भिडायला धावणारा शेलाटा बांधा आणि चांदणी रूप पाहूनच की काय कविवर्य बा. भ. बोरकरांनी त्यांना आकाशमोगरी म्हटले असावे. या फुलांचा घनदाट सडा पडतो. तो वेचायला भवतालच्या मुली आणि आम्ही सकाळीच झाडाखाली गर्दी करत असू.
 दसरा दिवाळीचे दिवस येत आणि चमेलीच्या मांडवावर फुलांचे थेंब उतरून बसू लागत. टपोरे फुल. पाकळीच्या पाठीवर लालम छटा, शारीरिक प्रेमाची धुंदी आठवून देणारा त्यांचा उन्मादक गंध तरूणाईला छेडणारा. तर याच काळात कुंद कळ्यांची गर्दी होई. मंद पवित्र गंधाने आसमंताला निरामयतेचा स्पर्श देणारी कुंदाची शुभ्र फुले.
 मला तेव्हाही आणि आजही एक प्रश्न सतावतो. जाईजुई, मोगरा, चमेली, निशिगंध, कुंद ही सारीच सुगंधी फुले शुभ्राकिंत का? पांढरा चाफा सुगंधी, अपवाद फक्त चांदणी फुलांचा. शुभ्राकिंत निरामयता आणि ही सुगंधी फुले यांच्यात काही आंतरिक नाते असेल का?
 आज माझ्या अंगणात आकाश मोगरीचा शेलाटा वृक्ष उभा आहे. चमेली, कुंद, निशिगंध सारीच झाडे वेली आहेत. दारात 'सायलीची वेलण' नखऱ्यात उभी आहे.

रुणझुणत्या पाखरा / ८९