पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मन:पूर्वक प्रयत्न करते. पण ते चुकतेच. जेंव्हा आत्मभान येते तेंव्हा झाडावर झुलत्या रेशमी चिमुकल्या चवऱ्यांचे थवे झुलायला लागलेले असतात. आणि त्या जादुई सुगंधाची भुलई अवघे अस्तित्व अदृश्य करून टाकते.
 शिरिष वृक्षाच्या ओढीने मी त्याला त्याचे रोप आणायला सांगते. त्यानेही अगदी आज्ञाधारकपणे आणले. मग मृग बरसल्यावर अगदी स्वत: खणून खड्डा आम्ही ते रोवले. झाड पानांनी मोहरू लागले. झुलू लागले. पहाता पहाता सात वर्षे निघून गेली. त्या नववयसा झाडावर कळ्यांचे घोस लखडू लागले. आणि एक दिवस काही कळ्यांनी साई सुटयो म्हणत डोळे उघडले. पिस्ता रंगाच्या चवऱ्याऐवजी फिकट गुलाबी रंगाच्या चवऱ्या झुलू लागल्या. पण सुंगधी लहरींची वलये? ते मात्र 'नस्से'. निर्गंधी फुले. मग माझा वैताग. तोही हिरमुरलेला. मग जिथून ते रोप आणले ते गृहस्थ घरी भेटायला.
 'मॅडम या झाडाला रेनबो फ्लॉवर म्हणतात. हे झाड चोहोबाजूंनी बहरते. वाऱ्याची लयलूट. डोळे सुखावणारा रंग बहार...
 'रंग मात्र फारच मधुर राणी रंगातली अगदी हलकी छटा. असू दे असू दे' निराशा लपवी माझे आभार.
 अशी ही वसंती चाहूल भवतालच्या पक्षापानांना किती सहजपणे लागत असते ना. एका संध्याकाळी तीन वर्षांपूर्वीची माझी लाडकी विद्यार्थिनी आशा वेलीमोगरीच्या फुलांचा गजरा घेऊन येते. ती पायऱ्या चढत असतांनाचा मोगरीचा घनदाट दरवळ घरभर पसरतो.
 'बाई , हा गजरा, तुमच्या लाडक्या फुलांचा आणि अंधार झाला की हे सुंगधी चांदणं पहाया या' असे सांगून जाते. मला रात्रीचे वेध लागतात. वेली मोगरा क्वचितच आढळतो. हे दोन वेल थेट वरच्या मजल्या पर्यंत पोचले आहेत. एकात एक गुंतलेली हिरव्या पानाची वलयदार नक्षी. फेब्रुवारीच्या मध्यातच लक्षलक्ष कळ्यांनी लखलखून जाते. चंद्र चढणीला लागला की अक्षरश: फुलांची झुलती झुंबरे लटकू लागतात. मनाच्या कोपऱ्यातून साठलेले सारे मळ नाहीसे करून निरामयतेच्या वाटेने नेणाऱ्या निर्मल मधुर गंधाच्या पुरात आपण बुडून जातो नव्हे वाहून जातो. आणि कवितेच्या ओळी आठवतात.

मज नकळत कळते कळते
गंधातून गूढ उकलते.

 त्याच्या सर्वात्मक अस्तित्वाची साक्ष आपल्या तनामनामधून पसरते. दगडातील सगुण देव न दिसणाऱ्या माझ्या सारख्या अनेकांनाही...

८८ / रुणझुणत्या पाखरा