पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 प्रत्येक लिंबोणीच्या झाडाचा रंग असा कोवळा का दिसतोय? काल परवापर्यंत ही झाडं हिरव्यागार रंगात तांबुस अंजिरी छटा लेवून बसली होती. आणि आज चक्क चांदणरंगी झिरझिरीत अवगुंठणाने चेहेरा झाकुन घेतलेल्या स्वप्नमोहिनी सारखी का दिसत आहेत? ...त्या मागे पळणाऱ्या झाडांच्या फुलांचा किंचीत कडवट मधूर गंध. निंबवृक्षाकडे पहातांना मनात शब्दचित्रे उमटत होती. निंबाची कोवळी केशरी पाने, गूळ, बत्तासे, गोमुत्र यांच्या मिश्रणाचं तीर्थ नाही का घेतलं पाडव्याला? अर्थात गोमुत्रा ऐवजी आता पाणी घालतो आपण.
 दोहोबाजूंची चांदणस्वप्नांची मोहरलेली झाडं निरखण्यात दंग असतांनाच एक विलक्षण मधूर गंध अंगाअंगाला छेडून गेला. मी दचकून भवताली पाहिले. अधमुऱ्या हिरवट रंगाच्या फुलांचे शिरिषाचे ते झाड. बिस्किटी पिवळ्या रंगाच्या रूंद लांबोड्या शेंगाचे खुळखुळे वाजवीत जणू माझीच वाट पहात उभे आहे. कॉलेजच्या रस्त्यावरच्या या झाडांवर फुले कधी थव्या थव्यांनी येऊन उतरतात नि विलक्षण मत्तमंद सुगंधाची वादळे भवताली पेरीत रहातात ते कळत नाही. आणि मी भानावर येऊन हळहळत रहाते. मला फुलत जाणारे झाड पहायचे असते. खरं तर झाडाच्या पानात लपलेल्या हिरव्या रूंदबंद शेंगा पिवळ्या होतानाचा बदल मला निरखायचा असतो. आणि झाडावरच्या कळ्यांची कुलपे उघडून त्यातील रेशमी चवऱ्यांनी झुलती फुले कधी उमलतात हेही मला अगदी एकटक निरखायचे असते. गेली तीस पस्तीस वर्षे हे वेळापत्रक साधण्याचा मी

रुणझुणत्या पाखरा / ८७