पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/87

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 जीनांना धर्माधिष्ठित राष्ट्र नको होते याचा अर्थ इतकाच होतो की त्यांना शरियतवर आधारलेले राष्ट्र नको होते. पाकिस्तानात सर्व नागरिकांना समान अधिकार राहतील, कोणत्याही धर्मगटाचे वर्चस्व राहणार नाही असा होतो. परंतु मुस्लिम समाजाचे वर्चस्व राहील असे राज्य निर्माण करण्यासाठी जीना धडपडतात आणि ते निर्माण झाल्यानंतर धर्मनिरपेक्षतेची घोषणा करतात त्याला एक विशिष्ट अर्थ आहे. या घोषणेबरोबरच इस्लामने तेराशे वर्षांपूर्वी लोकशाही आणली आणि इस्लामने अल्पसंख्यांकांना नेहमी उदारतेनेच वागविले आहे अशी हास्यास्पद, अडाणी विधाने करतात. या दोन परस्परविरोधी विधानांतून जीनांचे जे चित्र उभे राहते ते नीट समजून घेतले पाहिजे. त्यांच्या मते इस्लाम धर्मानेच धर्मनिरपेक्षतेचा सिद्धांत जगात आणला इस्लामने अल्पसंख्यांकांना उदारतेने वागविले आहे असे ते सांगतात तेव्हा त्यांना पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांच्या हकालपट्टीच्या जबाबदारीतून स्वत:ला आणि मुस्लिम समाजाला मुक्त करून घ्यावयाचे होते हे स्पष्ट आहे.
 येथे दोन प्रश्न उपस्थित होतात. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना वाचविण्यासाठी, नव्हे त्यांना समान स्थान लाभावे म्हणून, जीनांनी कोणते नवे प्रवाह निर्माण केले? आणि भारताबरोबर मैत्रीचे संबंध ठेवण्यासाठी कोणते प्रामाणिक प्रयत्न केले? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे शोधली. तर राजकारणी म्हणून ते खेळत असलेल्या डावपेचातील त्यांच्या या घोषणा काही टप्पे आहेत असे दिसून येईल.

 पाकिस्तान हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र व्हावे असे जीनांना खरोखर वाटत होते तर जीनांनी पाकिस्तानच्या पहिल्या मंत्रिमंडळात सर्वधर्मीयांचा समावेश केला असता, (जोगेन्द्रनाथ मंडल हे हरिजनांचे प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळांत होते, हिंदू म्हणून नव्हे. हिंदूंत फूट पाडण्याच्या. जीनांच्या उद्योगातील मंडल हे एक प्यादे होते. आपण लीगवाल्यांच्या जातीयवादाला बळी पडल्याची जाणीव मंडल यांना फार उशिरा झाली आणि अखेरीला १९५० साली ते राजीनामा देऊन भारतात निघून आले.) तसा तो केलेला नाही. कारभार मुस्लिम लीग पाहत होती आणि ती मुसलमानांचे प्रतिनिधित्व करीत होती, सर्व पाकिस्तान्यांचे नव्हे. पाकिस्तानच्या नव्या स्वरूपात जीनांनी धर्मनिरपेक्ष पक्ष स्थापन करण्याबाबत पुढाकार घेतला असता. फाळणीपूर्वी अल्पसंख्यांक मुसलमानांचे हित पाहणारी मुस्लिम लीग ही संघटना.फाळणीनंतर पाकिस्तानच्या बहुसंख्यांक मुसलमानांचे हित पाहू लागली. पाकिस्तानची ध्येयप्रणाली धर्मनिरपेक्ष असल्याच्या जीनांनी कितीही घोषणा केल्या तरी मुस्लिम लीगची ध्येयप्रणाली जातीयवादीच होती आणि जीना किंवा लियाकतअली खान हेच लीगचे सूत्रधार होते. तिच्या व्यासपीठावरून फाळणीनंतरही भडक हिंदूविरोधी भाषणे होतच होती. अशा जातीयवादी संघटनेद्वारे जीना पाकिस्तानच्या धर्मनिरपेक्षतेचा पाया घालणार होते, असे येथे राहिलेले एम.आर.ए.बेग, ए.जी. नुराणी यांच्यासारखे जीनावादी सांगतात. आणि यावर भारतातील चिमणलाल सेटलवाड व त्यांच्या पंथातील भोळसट हिंदू विश्वास ठेवतात ह्याचे आश्चर्य वाटते. सुमारे चौदा महिन्यांच्या जीनांच्या गव्हर्नर जनरलच्या कारकीर्दीत त्यांनी पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांच्या किती कार्यक्रमांना उपस्थित राहून धर्मनिरपेक्षतेचा आदर्श घालून दिला आहे याची वरील महाभागांनी आम्हा पामरांना माहिती मिळवून दिली तर ते फार उपयुक्त

८६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान