पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/88

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेठरेल. किती दंगलग्रस्त भागांना जीनांनी व लियाकतअली खानांनी भेटी दिल्या याचीही एकदा नोंद झाली तर बरे होईल. (जीनांचे अधिकृत चरित्रकार - Hecter Bolleth हे आपल्या 'Creator of Pakistan' या पुस्तकात पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना मुसलमानांनी उदारतेने वागविले नाही म्हणून जीना व्यथित झाले असे एके ठिकाणी सांगतात. जीना आदर्श मानवतावादी होते असे सिद्ध करण्याची पाकिस्तानची धडपड आपण समजू शकतो. बोलेथोसारख्या कंत्राटी चरित्रकाराने पाकिस्तानच्या प्रचारयंत्रणेची तामिली करावी - यात अर्थातच आश्चर्य मानण्याचे कारण नाही. परंतु जीनांची अल्पसंख्यांकांविषयीची व्यथा . त्यांच्या जाहीर वक्तव्यात कुठेच कशी प्रगट झाली नाही हे बोलेथो आणि जीनांचे इतर समर्थक सांगायला सोयीस्करपणे विसरतात. कारण जीनांची ही व्यथा खासगी संभाषणात व्यक्त झालेली आहे. खासगी संभाषणातून व्यक्त होणाऱ्या मतांच्या आधारे एखाद्या व्यक्तीची . राजकीय मतप्रणाली अजमाविण्याची ही फार अजब पद्धत आहे. जीनांच्या दुष्कृत्यांवर रंगसफेती करणे याखेरीज त्याला वेगळा अधिक अर्थ नाही.)
 वस्तुस्थिती उलट आहे. फाळणीच्या काही दिवस आधी लियाकतअली खानांनी पूर्व पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे दंगली होत आहेत असे निवेदन काढले. या निवेदनातील लबाडी स्पष्ट आहे. नेमके संकल्पित पाकिस्तानचे प्रदेश वगळून 'दंगली हिंदू करीत आहेत' असे लियाकतअली खानांना सुचवायचे आहे. वस्तुत: पंजाबच्या दोन्ही भागांत दंगली होत होत्या, सरहद्द प्रांतात दंगली होत होत्या. बलुचिस्तानात दंगलींना सुरुवात होत होती. पाकिस्तानात दंगली होत नाहीत असे सांगणे म्हणजे एक प्रकारे दंगलींचे समर्थन करणे आहे. जीनांनी याच युक्त्यांचा अवलंब केला होता. फाळणीनंतर पंजाबमध्ये दंगली उसळल्या, त्या दंगलींचा आरंभ कुणी केला हा एक वादाचा विषय आहे. पंजाबच्या फाळणीमुळे कडवट बनलेल्या शीखांनी प्रथम हत्यार उचलले असे म्हटले जाते. ते खरे आहे असे मानले तरी त्याआधी पंजाबात लीगवाल्यांनी जीनांच्या आशीर्वादाने आणि येथे गव्हर्नर असलेल्या सर आयव्हान जेन्किन्स यांच्या पाठिंब्याने संघटित दंगली घडवून आणल्याच होत्या. त्यामुळे शीख कडवट बनले तर आश्चर्य मानण्याचे कारण नाही.

 तथापि पहिली गोळी कुणी झाडली हा वाद बाजूला ठेवला तरी पंजाबच्या दोन्ही भागांत अल्पसंख्यांकांविरुद्ध दंगली झाल्या आणि दोन्ही दिशांनी निर्वासितांचा लोंढा वाहू लागला. पश्चिम पंजाबमध्ये शीखांनी पूर्व पंजाबमध्ये सुरू केलेल्या दंगलींची प्रतिक्रिया झाली असे वादाकरिता मानले तरी सिंध, बलुचिस्तान आणि सरहद्द प्रांत येथील दंगली कशाची प्रतिक्रिया होती? जीनांना या दंगलीबाबत कुणावरच खापर फोडता येणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी ते तेथील हिंदूंच्या डोक्यावर फोडले. सिंधमधून हिंदू बाहेर पडू लागले तेव्हा, त्यांना भारताने बोलावले म्हणून ते बाहेर जात आहेत असे जीनांनी उद्गार काढले. निर्लज्ज हृदयशून्यतेचे याहून दुसरे ढळढळीत उदाहरण सापडणार नाही. (जीनांनी हे म्हटल्यानंतर पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि भारतीय मुसलमानांचे प्रवक्ते यांनी नेहमी या असत्याचा पुनरुच्चार केला आहे. गांधीजींच्या सांगण्यावरून अनेक काँग्रेसनेते तेव्हा पश्चिम पाकिस्तानात जाऊन तेथील हिंदूंना स्थलांतर करू नका असे सांगत होते. पेन्डेरल मून यांच्या 'Divide and Quit'

भारत - पाक संबंध/८७