पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिवाय भारतीय मुसलमानांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी जीनांना हा सिद्धांत बदलणे आवश्यक होते.
 "We are not only different and distinct, but antagonistic. No amount of statemanship can remove the fundamental antagonism between Hindus and Muslims."
 जीनांनी ३० मार्च १९४७ रोजी नॉर्मन क्लिफ यांना दिलेल्या मुलाखतीतील हा वरील उतारा आहे. जीनांची मनोभूमिका त्यातून प्रकट होतेच, परंतु पाकिस्तानच्या स्थापनेनंतर जीनांचे काँग्रेसच्या नेत्यांविरुद्धचे आणि भारताविरुद्धचे पुढे चालू राहिलेले शत्रुत्वाचे धोरण आणि भारत व पाकिस्तान यांच्या गेल्या तेवीस वर्षांच्या तणावांचा इतिहास आणि त्याची कारणे आपल्याला या उताऱ्यात सापडतात. 'आम्ही केवळ वेगळे नाहीत, परस्परविरोधी आहेत.' हे त्यांचे उद्गार सूचक आहोत. फाळणीनंतर प्रश्न मिटला नाही. कारण मुसलमान समाज आणि त्या समाजाचे नेतृत्व केवळ विभक्तवादी नव्हते, ते हिंदविरोधी होते, याचा जीनांचे हे उद्गार हा पुरावा आहे. याचा अर्थ हिंदू समाजात मुस्लिमविरोधी भावना नव्हत्या असेही नव्हे. परंतु जीना दर्शवितात तेवढ्या त्या खचित नव्हत्या. हिंदू आणि मुस्लिम समाज परस्परविरोधी आहेत असे गांधी-नेहरू कधी म्हणाले नाहीत. याचा अर्थ हिंदू – मुसलमानांतील तणाव ते अमान्य करीत होते असाही नव्हे. त्यांना हे तणाव राह नयेत असे अभिप्रेत होते. त्या तणावाचे हिंदंतर्फे ते प्रतिनिधीत्व करीत नव्हते; हे तणाव नष्ट करू पाहणाऱ्या प्रवाहाचे ते नेतृत्व करीत होते. जीनांना वरील मुलाखतीत हे दोन्ही समाज परस्परविरोधी आहेत एवढेच निदर्शनास आणावयाचे नाही. "No amount of statesmanship can remove the fundamental antagonism betwenn Hindus and Muslims" असे जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ हे तणाव चालू राहावे, हे त्यांना अभिप्रेत आहे आणि मुस्लिम समाजातर्फे या ऐतिहासिक संघर्षाचे नेतृत्व करण्याची तयारी त्यांनी केलेली आहे असा होतो.

 फाळणीची योजना मान्य केल्यानंतर मुंबईला वार्ताहरांना दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत 'पाकिस्तान हे धर्माधिष्ठित राज्य होणार का?' असा एक प्रश्न एका वार्ताहराने विचारला. या प्रश्नाचे सरळ उत्तर जीनांनी टाळले आहे आणि त्यानंतर ११ ऑगस्टला पाकिस्तान हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र होणार असल्याची घोषणा त्यांनी पाकिस्तानच्या घटनासमितीत केली. या घोषणेची आरंभी चर्चा केली आहे. जीनांनी या काळात भारताबरोबर संबंध सुधारण्याच्याही अनेक घोषणा केल्या. या घोषणांचे अर्थही एकदा नीट समजावून घेतले पाहिजेत. ते म्हणाले आहेत, “पाकिस्तान व भारत ही दोन स्वतंत्र, सार्वभौम आणि समान राज्ये आहेत, म्हणून भारताबरोबर मैत्रीचे संबंध ठेवण्यासाठी करार करण्याची आमची नेहमीच तयारी आहे." जीनांच्या आधीच्या राष्ट्रवादाच्या कल्पना जशा त्यांनी स्वत:च ठरविलेल्या होत्या तशाच दोन राष्ट्रांच्या समानतेच्या त्यांच्या कल्पनादेखील त्यांनीच ठरवलेल्या होत्या. जीनांच्या घोषणेतील 'समान' यामागे Parity चा अर्थ दडलेला आहे. 'पाकिस्तान हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र होईल' आणि 'भारताबरोबर समानतेच्या पायावर आम्ही मैत्री करू' या दोन घोषणांचे अर्थ त्यांच्या वर्तनातून लावावे लागतील.

भारत - पाक संबंध/८५