पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सिद्धता केली. सिंधमध्येदेखील दंगलींचा घाट लीगवाल्यांनी घातला होता असे दिसते. अल्वाहिद या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लीग मंत्रिमंडळाचे दोन मंत्री मीर गुलामअली कालपूर व पीर इलाहीबक्ष यांनी हिंदूंना धमक्या देणारी वक्तव्ये केली. ते म्हणाले, हिंदू अल्पसंख्यांकांना गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल. परंतु सिंधच्या गव्हर्नरांनी आणि व्हाईसरॉयनी या दोन मंत्र्यांना समज दिली आणि सिंधमध्ये कृतिदिनाच्या दिवशी शांतताभंग होता कामा नये असे बजाविले. कलकत्त्यात मात्र लीगने हिंदूंच्या रक्ताने कृतिदिन साजरा करावयाचा निश्चय केला होता. सकाळीच हिंदूंवर हल्ले सुरू झाले. काय होते आहे हेच त्यांना आधी कळले नाही. निरपराध बायका-मुलेही या हत्याकांडातून वगळली गेली नाहीत. दुपारनंतर शीख संघटित झाले आणि त्यांनी प्रतिप्रहार करायला सुरुवात केली. मग हिंदूंनीही संघटितपणे प्रतिकार सुरू केला. राज्ययंत्रणा लीगच्याच ताब्यात होती. सुहावर्दी गृहमंत्रीदेखील होते. पोलिस कंट्रोल रूममध्ये जाऊन त्यांनी कंट्रोलरूमचा ताबा घेतला आणि पोलिसांना निष्प्रभ करून ठेवले. पूर्व विभागाचे सैनिकी अधिकारी सर फॅन्सिस टकर यांना ते “परिस्थिती ताब्यात आहे, सैन्य बोलावण्याची जरूरी नाही" असे सांगत होते. मात्र दुसऱ्या दिवसापासून हिंदूंनी मुसलमानांवर हल्ले सुरू करताच सुहावीची राज्ययंत्रणा खडबडून जागी झाली. सैन्याला त्यांनी पाचारण केले. (पहा - Sir Francis Tucker यांचे पुस्तक व बंगाल सरकारच्या गृहखात्याचा दंगलीच्या चौकशीचा अहवाल, "Note on the causes of Calcutta ' Distarbance, August 1946) एकूण ६००० स्त्रिया, मुले आणि पुरुष या दंगलीत ठार झाली. दोन्ही जमातींची मृत्युसंख्या जवळजवळ सारखीच होती. जीनांनी या दंगलींनंतर काढलेले पत्रक मासलेवाईक आहे. आम्हाला बदनाम करण्यासाठी इतरांनी ह्या दंगली घडविल्या असाव्यात असे त्यांनी म्हटले. पाकिस्तानचे एक कट्टर पुरस्कर्ते ब्रिटिश पत्रकार आर्यन. स्टीफन हे तेव्हा 'स्टेट्समन' या कलकत्त्याच्या दैनिकाचे संपादक होते. लीगला आणि विशेषत: बंगालच्या लीग मंत्रिमंडळाला तेसुद्धा दोषमुक्त ठरवू शकले नाहीत. (पहा -Statesman', 20 August, 1946) लीगच्या या तंत्राची 'गँगस्टर्स मेथड' या शब्दांत नेहरूंनी निर्भर्त्सना केली. जीनांच्या या 'गँगस्टर्स मेथड'चा हिंदूंना यापुढे आणखी अनुभव येणारच होता. पाकिस्तानात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची लीगवाल्यांनी बंगालच्या हिंदूंना दाखविलेली ही चुणूक होती.

 दंगलींचे हे लोण नौआखली आणि टिपेरा या भागात पसरले. नौआखलीत लीगवाल्यांच्या पुढाकाराने हिंदूंवर हल्ले झाले. शेकडोंची हत्या झाली. स्त्रियांवर बलात्कार झाले. असंख्य स्त्रियांना पळवून त्यांचे सक्तीने धर्मांतर करण्यात आले. (या सक्तीच्या धर्मांतराबद्दल जीनांनी 'ब्र' देखील काढल्याचे ऐकिवात नाही. उलट दंगलींच्या बातम्या हिंदू वृत्तपत्रांनी अतिरंजित छापल्या अशी त्यांनी मागाहून माउंटबॅटन यांचे खासगी चिटणीस अॅलन कॅम्बेल जॉन्सन यांच्यापाशी तक्रार केली. त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या निष्ठुर पद्धतीची आणि मानवी जीवनाविषयीच्या बेदरकारीची साक्ष देतात. ते जॉन्सनना म्हणाले, “नौआखलीत फक्त शंभरच हिंदू मेले. हिंदू वृत्तपत्रांनी मनुष्यहत्येच्या अतिरंजित बातम्या छापल्या. 'मनुष्यहत्या' शंभराच्या आतच होती असे मानले तरी त्या प्रकाराचे अमानुषत्व कसे काय कमी होते? पहा

७४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान