पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबर मुसलमान नव्हतेच, परंतु ते फुटूनही निघाले नाहीत. जीनांच्या बदलत्या भूमिकेला काँग्रेसचे नेते जबाबदार होते असे म्हणणे म्हणजे आरंभापासून अखेरपर्यंत जीनांना मुसलमानांनी आपला एकमेव नेता मानले होते असे गृहीत धरणे आहे. डॉ. खऱ्यांनी जातीयवादी भूमिका घेतली. रत्नागिरीच्या तुरुंगातून सुटल्यानंतर सावरकरांनीही उघडपणे हिंदुवादी भूमिका मांडायला सुरुवात केली. त्यांच्यामागे हिंदू का गोळा झाले नाहीत? जीनांनी हिंदूविरोधी भूमिका घेताच त्यांच्यामागे मुसलमान का गोळा झाले? आणि सुभाषबाबूंनी बंगाल्यांविरुद्ध अन्याय होतो अशी भूमिका का घेतली नाही? मुसलमानांवर अन्याय होतो आहे अशी भूमिका जीनांनी का घेतली? या प्रश्नांची उत्तरे शोधल्याखेरीज फाळणीची ऐतिहासिक कारणपरंपरा समजू शकणार नाही.
 आणि कारणे स्पष्ट आहेत. हिंदूंना डॉ. खऱ्यांच्या किंवा सावरकरांच्या मुस्लिमविरोधाचे आवाहन मान्य झाले नाही. मुसलमान जीनांच्या हिंदूविरोधाकडे आकर्षित झाले. सुभाषबाबूंना या देशाचा राष्ट्रवाद आणि अखंडत्व नेहमी प्रिय होते. या प्रश्नावर त्यांचे गांधीजींशी कधीच मतभेद नव्हते. स्वतंत्र भारताचा त्या दोघांच्या मनातील आराखडा एकच होता. त्यातील बंगालच्या स्थानाबद्दल काही मतभेद नव्हते. जीनांना समान नागरिकत्वावर आधारलेला राष्ट्रवाद कधीच मान्य नव्हता आणि मुसलमानांच्या स्वतंत्र भारतातील स्थानाबाबत काँग्रेस नेत्यांबरोबर नेहमीच मतभेद होते. गांधीजी आणि नेहरू यांच्या मनातील स्वतंत्र भारताचा आराखडा आणि जीनांच्या मनातील स्वतंत्र भारताची कल्पना यांच्यात नेहमीच तफावत राहिली होती.
 हे मतभेद फक्त एकदाच मिटले होते आणि तेव्हा गांधी-नेहरूंचा उदय झाला नव्हता. हा जमाना टिळकांच्या नेतृत्वाचा होता आणि या देशाचा राष्ट्रीय प्रवाह आणि जीनांच्या स्वतंत्र भारताच्या राष्ट्रवादाच्या कल्पना यांतील अंतर नष्ट करण्याचा प्रयत्न १९१६ साली लो. टिळकांनी त्यांच्याबरोबर लखनौ कराराने केला. लखनौ-करार हे जीनांनी समान. नागरिकत्वाचा प्रवाह मान्य केल्याचे निदर्शक नव्हते. काँग्रेसने, मुख्यत: टिळकांनी, जीनाप्रणीत मुस्लिम राष्ट्रवादाशी तडजोड केल्याची ती निशाणी होती. लखनौ-कराराने मुसलमानांच्या वेगळ्या मतदारसंघांना केवळ मान्यता दिलेली नाही, त्यामुळे फारसे काही बिघडले नसते. मुसलमानांना या करारात ते अल्पसंख्यांक होते तिथे संख्येहन अधिक प्रतिनिधित्व देण्यात आले होते. केंद्रात ते आठ टक्के अधिक म्हणजे तेहतीस टक्के ठरविण्यात आले. इतकेच नव्हे तर एखादे बिगरसरकारी विधेयक उभय जमातींच्या तीन चतुर्थांश सभासदांची मान्यता नसल्यास कायदेमंडळात मंजूर केले जाऊ नये असेही ठरविण्यात आले. या तडजोडीत मुसलमान बहुसंख्यांक प्रांतांतील हिंदूंना संख्येहून अधिक प्रतिनिधित्व मात्र देण्यात आले नव्हते. उत्तर प्रदेशात जेथे मुसलमानांची संख्या सोळा टक्के होती तेथे त्यांना तीस टक्के प्रतिनिधित्व देण्यात आले.

 लखनौ कराराच्या या कलमावरून जीनांच्या राष्ट्रवादाच्या कलमांची कल्पना येते. दोन जमाती समान सार्वभौम आहेत आणि म्हणून त्यांच्या समान सामुदायिक भागीदारीची राज्यव्यवस्था हवी असे थोडक्यात जीनांच्या राष्ट्रवादाच्या कल्पनेविषयी म्हणता येईल.

मुसलमानांच्या धार्मिक चळवळी /५५