पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/57

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कोणतेही विधेयक तीन चतुर्थांश मुस्लिम सभासदांच्या संमतीविना कायदेमंडळात मंजूर होणार नाही, हे कलम अल्पसंख्यांक जमातीची बहुसंख्यांकांबरोबर राज्यकारभारात, सर्वच क्षेत्रांत समान भागीदारी प्रस्थापित करणारे होते. मुस्लिम अल्पसंख्यांक प्रांतात मुसलमानांना संख्येहून अधिक प्रतिनिधित्व दिल्यावर हिंदू अल्पसंख्यांक असलेल्या प्रांतांत तेथील हिंदूंनाही तसे दिले जाणे आवश्यक होते. पण तसे देण्याची तरतूद लखनौ करारात नव्हती. जीनांच्या तथाकथित उदारमतवादाची आणि भारतीय राष्ट्रवादाशी जुळवून घेण्याच्या तयारीची मजल येथपर्यंतच गेली होती. त्यात मुसलमान समाज हे एक राष्ट्र आहे ही कल्पना अभिप्रेत होतीच. एरवी पंचवीस टक्के जमातीला पॅरिटीचे आणि व्हेटोचे (धर्मप्रश्नांबाबत मुस्लिम बहुसंख्यांक सभासदांची संमती आवश्यक आहे असा आग्रह मी समजू शकलो असतो. लखनौ करारातील कलम तेवढे मर्यादित नाही. शिवाय हिंदू अल्पसंख्यांक असलेल्या प्रांतांतील हिंदूंबाबत जीनांची बेपर्वाई आणि टिळकांचा धरसोडपणा अक्षम्य आहे.) अधिकार मागण्याच्या जीनांच्या या भूमिकेचे समर्थन करताच येत नाही.
 हा करार झाल्यानंतर त्याच वर्षीच्या मुस्लिम लीगच्या अध्यक्षपदावरून जीनांनी. काढलेले उद्गार अर्थपूर्ण आहेत. मुसलमानांना त्यांचा वेगळा खलिफा निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. आपण आणि मुस्लिम लीगचे इतर पुढारी भारतीय मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आहोत असाही त्यांनी या भाषणात दावा केला आहे. येथे जीनांच्या कल्पना स्पष्ट होतात. आपण मुसलमानांचे एकमेव नेते व्हावे अशी त्यांची आकांक्षा होती. आपल्याला मुसलमानांत गोखल्यांसारखे स्थान लाभावे असे त्यांना वाटत असे. गोखले आणि काही प्रमाणात टिळक यांच्या राजकीय वर्तनावर जीनांनी कधी टीका केलेली नाही. गोखल्यांविषयी ते आदराने बोलत. गांधी-नेहरूंवर टीका करतानादेखील 'गोखल्यांचा मोठेपणा ते दाखवीत नाहीत' असे म्हणत. जीनांनी हा फरक करण्याची कारणे स्पष्ट आहेत. गोखले उदारतेने मुसलमानांना केंद्रात चाळीस टक्के प्रतिनिधित्व द्यायला तयार झाले होते. टिळक वेगळा मतदारसंघ देत होते, मुस्लिम अल्पसंख्यांक प्रांतात संख्येहून अधिक प्रतिनिधित्व देत होते आणि मुख्य म्हणजे मुस्लिम लीगशी करार करून ही संघटना मुसलमानांची प्रतिनिधी आहे आणि पर्यायाने काँग्रेस ही हिंदूंची प्रतिनिधी आहे असे मान्य करीत होते. "तुम्ही माझ्याशी टिळकांप्रमाणे बोलणी का करीत नाही? ते हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून माझ्याशी बोलत होते." असे जीनांनी एकदा गांधी-नेहरूंना म्हटलेच होते. गांधीजी आणि नेहरू सर्वच जनतेचे आपण प्रतिनिधी आहोत असे म्हणवून घेत होते ही जीनांची खरी तक्रार होती. काँग्रेस हिंदू संघटना आहे, गांधी-नेहरू हिंदू आहेत, हे सगळे जीनांनी म्हणायला सुरूवात केली तेव्हा त्याचा अर्थ काँग्रेस हिंदू संघटना राहावी आणि गांधी-नेहरुंनी हिंदूंचेच प्रतिनिधित्व करावे असे जीनांना सुचवायचे होते. ते हिंदूंपुरता विचार करीत नाहीत हा जीनांचा त्यांच्यावर राग होता. जीनांची या संदर्भातील जातीयवादाची व्याख्या अजब होती. गांधी-नेहरू जातीयवादी विचार करीत नाहीत म्हणून ते जातीयवादी आहेत असे ते म्हणायचे.

 गांधीजींचा द्वेष जीनांनी करणे अगदी स्वाभाविक आहे. भारतीय राजकारणात प्रवेश करताच गांधीजींनी सूत्रे आपल्या हातात घेतली. जीनांना याचे वैषम्य वाटणे स्वाभाविकच

५६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान