पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/200

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


पटेलांच्या चुका दाखविल्या आहेत तशा मुस्लिम लीगच्या मागण्यांचे स्वरूप योग्य होते की अयोग्य होते याची चर्चा टाळली आहे. त्यांच्या विवेचनाचा सबंध दृष्टिकोन सवंग राजकारणी आहे हा या पुस्तकाचा मोठा दोष आहे. या प्रश्नामागील सामाजिक आणि धार्मिक प्रवाहांचीही ते दखल घेत नाहीत. जीनांचे दुखावणे, १९३७ सालात लींगला उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात दोन जागा न देणे, अशा काही बाबींमुळे देशाची फाळणी होते असेच ते जणू मानतात.
 या प्रश्नांमागील इतिहासाची पार्श्वभूमी लोहियांना आकलन झाली नव्हती. त्यांना हे जाणवत होते की इतिहासाचे जबरदस्त ओरखडे हिंदु आणि मुसलमान मनांवर उमटलेले . आहेत. या इतिहासाकडे आता वेगळ्या दृष्टिकोनातून सर्वांनाच पाहावे लागेल हेही त्यांना जाणवत होते. परंतु इतिहासाच्या नव्या जाणिवा कशाप्रकारे आणावयाच्या हे त्यांना आकलन झाले नाही. त्यांनी आपलेच काही ठोकताळे बसविले आणि ते लोकांसमोर मांडायला सुरवात केली. त्यांच्या मते बाबर, अकबर, इत्यादी राजे परकीय होते. औरंगजेब स्वकीय होता. शेरशहा स्वकीय होता. लोहियांना असे म्हणावयाचे आहे की जे पिढ्यान्पिढ्या येथे स्थायिक झाले त्यांना स्वकीय मानले पाहिजे. इब्राहिम लोदी या मुस्लिम राजाला नेस्तनाबूत । करून बाबर दिल्लीच्या सत्तेवर आला हे नमूद करताना, डॉ. लोहिया, एक मुस्लिम सत्ता दुसऱ्या मुस्लिम सत्तेला बुडवून अधिकारावर आली-हिंदू सत्तेला नव्हे-असे सूचित करतात. डॉ. लोहिया यांच्या या प्रतिपादनाला ऐतिहासिक श्रद्धेच्या संदर्भात फारसा अर्थ उरत नाही. बाबर आणि इब्राहिम लोदीची लढाई ही एक बाब आणि मुस्लिम राजवटीने हिंदू प्रजेवर केलेले अत्याचार ही दुसरी बाब-या दोन्ही बाबी एकाच पातळीवर बसविता येत नाहीत. (फ्रेन्च आणि ब्रिटिश यांच्या भारतावर स्वामित्व गाजविण्यासाठी झालेल्या लढायांसारखे हे स्वरूप आहे. अखेर दोन्ही सत्ता भारताला अंकित करण्यासाठी धडपडत होत्या. त्यांच्या लढायांचे स्वरूप आणि ब्रिटिशांनी भारतीय प्रजेवर केलेले अत्याचार यांचे स्वरूप एकच असू शकत नाही.) ऐतिहासिक श्रद्धा इतिहासातील वस्तुस्थिती मान्य न केल्याने बदलत नाहीत. या श्रद्धांच्या स्वरूपात म्हणायचे तर अकबराने मोगल सत्तेला भारतीय रंग देण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला परकीय मानले पाहिजे. शिवाय मोगल घराणे भारतात स्थायिक झाल्यानंतर अनेक पिढ्यांनी औरंगजेब जन्मला म्हणून त्याला स्वकीय माना असे म्हटल्याने हिंदूंच्या मनावरील औरंगजेबाच्या धर्मवादी धोरणाचे उमटलेले ओरखडे पुसले जात नाहीत. हा केवळ शब्दांचा खेळ आहे आणि डॉ. लोहिया यांच्यासारखे राजकारणपटू तो करतात याचे आश्चर्य वाटते.

 डॉ. लोहिया यांनी या पुस्तकात असे प्रतिपादन केले आहे की जोपर्यंत सध्याची फाळणी अस्तित्वात आहे तोपर्यंत हिंदू-मुसलमान संघर्ष कायम राहील. फाळणीने हा प्रश्न मिटलेला नाही, आता फाळणी रद्द करण्याचा प्रयोग करावा लागेल. ही फाळणी रद्द करावयाची म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्या कल्पनेतील अखंड हिंदुस्थान नव्हे. पाकिस्तान-हिंदस्थान ही संघराज्याची घटक राज्ये असतील. हवा तर जम्मू आणि काश्मीर राज्यांना वेगळ्या घटक राज्याचा दर्जा देण्यात येईल, पूर्व बंगालला वेगळे घटक राज्य बनवायला हरकत नाही. किंवा दोन्ही बंगाल एकत्र येत असतील तर त्यांचे एक घटक राज्य बनवावे. म्हणजे भारत,

समारोप /१९९