पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/199

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तडजोड होत नाही असे दिसून आले तेव्हा स्वराज्य मिळणे हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी आवश्यक आहे अशी त्यांनी नेमकी उलटी भूमिका घेतली. तेव्हापासून हा विचार काँग्रेस नेते सतत मांडू लागले होते. 'जातीय त्रिकोण' या पुस्तकातील विवेचनात सामाजिक तणावामागील सामाजिक, ऐतिहासिक आणि धार्मिक प्रेरणांची कुठे दखलच घेण्यात आली नाही. या पुस्तकातील विवेचनाप्रमाणे हिंदु-मुसलमान संबंधांचा वाद मामुली आहे, ब्रिटिशांनी कृत्रिम रीतीने तो जिवंत ठेवला आहे.
 गंमत अशी की स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस लीगबरोबर बोलणी करत होती. लीग काही मागण्या करीत होती. या मागण्यांबाबत आपली भूमिका कोणती हे समाजवाद्यांनी तेव्हा कधीच स्पष्ट केले नाही. फाळणीच्या ठरावावर तर समाजवादी तटस्थच राहिले आहेत. त्यांनी पाठिंबाही दिलेला नाही, विरोधही केलेला नाही.
 समाजवाद्यांचे म्हणणे असे होते की, फाळणीला आमचा विरोध होता म्हणून आम्ही फाळणीच्या ठरावाला पाठिंबा दिला नाही. परंतु फाळणीला पर्यायी योजनादेखील आमच्यापाशी नव्हती. म्हणून आम्ही ठरावाला विरोधही केला नाही, तटस्थ राहिलो. हा पर्याय डॉ. लोहिया यांनी फाळणीनंतर सुमारे पंधरा वर्षांनी शोधून काढला. त्यांच्या मते भारत आणि पाकिस्तान यांचे महासंघराज्य करणे हा पर्याय आहे. समाजवादी पक्षाचे या प्रश्नावरील धोरण प्रामुख्याने डॉ. लोहियांच्या सिद्धांतावर अवलंबून असल्याने त्यांच्या भूमिकेचा विचार करणे योग्य ठरेल.

 डॉ. लोहिया यांची भूमिका 'Fragments of World Mind' या त्यांच्या एका पुस्तकातील पाकिस्तानविषयक प्रकरणातून, भाषणातून आणि विशेषत: 'Guilty men of India's Partition' यातून आढळते. डॉ. लोहिया यांनी फाळणीला नेहरू व पटेल यांना जबाबदार धरले आहे. त्यांच्या 'Guilty Men of India's Partition' या पुस्तकात अनेकदा परस्परविरोधी विधानेही केलेली आहेत. १९३७ साली काँग्रेसने उत्तर प्रदेशात मुस्लिम लीगला मंत्रिमंडळात दोन जागा दिल्या नाहीत म्हणून मुस्लिम लीगने फाळणीची वाट धरली असा युक्तिवाद डॉ. लोहिया आपल्या पुस्तकात करतात. १९३७ सालच्या घटनांसंबंधी विवेचन मागे येऊन गेले असल्यामुळे डॉ. लोहिया यांच्या या मतावर येथे भाष्य करण्याची जरुरी नाही. डॉ. लोहिया यांनी नेहरू आणि पटेल यांना सत्तेची हाव सुटल्यामुळे त्यांनी फाळणी स्वीकारली असा हेत्वारोप केला आहे. हा हेत्वारोप बाजूला ठेवला तरी जीनांच्या धमकावण्यांना काँग्रेसने बळी पडावयाला नको होते असे लोहियांचे म्हणणे होते. याचा अर्थ लोहिया जीनांचे धमकावणे चुकीचे होते असे मानतात, असा होतो. धाकटा भाऊ हातात सुरा घेऊन किंवा बाहेरच्या गुंडांना बरोबर आणून थोरल्या भावाजवळ संपत्तीचा आपला वाटा मागावयास आला तर थोरल्या भावाने या धमकावणीला बळी पडू नये असे म्हणणारे, धाकटा भाऊ सुरा किंवा गुंड घेऊन आला याबद्दल त्यालाही जाब विचारतात. लोहियांच्या पुस्तकात हा समतोलपणा कुठेच दिसत नाही. दडपणाला बळी पडल्याबद्दल नेहरू आणि पटेलांवर हेत्वारोप करणारे डॉ. लोहिया जीनांनी दंगलीच्या धमक्या दिल्या-नव्हे दंगली घडविल्या-याबद्दल मूग गिळून गप्प बसलेले दिसतात. जशा त्यांनी काँग्रेसच्या आणि नेहरू

१९८/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान