पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/201

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाकिस्तान, काश्मीर, बंगाल किंवा पूर्व बंगाल ही घटक राज्ये असलेले एक महासंघराज्य उपखंडात अस्तित्वात यावे. यांच्यातील संबंध कसे असावेत याचा तपशील मागाहून ठरविण्यात येईल.
 संयुक्त भारतात राहण्यासाठी मुस्लिम लीगने एकदा समान भागीदाराची (पन्नास टक्के) योजना मांडली होती. लोहियांनी या योजनेवर कधी मत प्रदर्शित केल्याचे ऐकिवात नाही. परंतु संघराज्याची योजना म्हणजे मागच्या दाराने समान भागीदारीची योजना अंमलात आणण्यासारखे आहे. दुसरी गोष्ट अशी की आता अनेक वर्षे लोटल्यानंतर पाकिस्तान आणि भारत या दोघांमध्ये राष्ट्रीयत्वाच्या वेगळ्या भावना, वेगळ्या आकांक्षा निर्माण झाल्या आहेत. कागदावर संघराज्य निर्माण करून या आकांक्षांचा एक प्रवाह कसा करता येईल याचे लोहियांनी काहीही विवेचन केलेले नाही. शिवाय जे मुसलमान भांडून वेगळे राज्य करावयास निघाले आणि ज्यांनी ते निर्मिले आणि आतापर्यंत जे जोपासले, ते आता पुन्हा संघराज्यात कसे येतील? जर फाळणीनंतर भांडण उरले नसते, संबंध स्नेहाचे झाले असते, तर पुन्हा एकत्र येण्याचा रस्ता खुला राहिला असता. फाळणीनंतर उलट कटुता अधिक वाढली आहे. पाकिस्तानने भारताशी सतत उभा दावा मांडला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानने संघराज्यात सामील व्हावे असे पाकिस्तानचे एकाएकी मतपरिवर्तन होणार आहे असे मानावयाचे काय? हे कोणी व कसे घडवून आणावयाचे याच्यासंबंधी लोहिया काहीही विवेचन आपल्या पुस्तकात करीत नाहीत. परंतु हा मुद्दा बाजूला ठेवला तरी संघराज्याचा प्रयोग यशस्वी होईलच असे मानण्याचे कारण नाही. इजिप्त आणि सीरिया यांचे संघराज्य टिकले नाही. मलेशिया आणि सिंगापूर हीदेखील एकत्र राहू शकली नाहीत. हा इतिहास ताजा आहे. इजिप्त-सीरिया, किंवा मलेशिया-सिंगापूर एकत्र येण्याची प्रक्रिया जशी शांततामय मार्गांनी झाली तशी विभक्त होण्याची प्रक्रियादेखील शांततापूर्ण मार्गांनी झाली आहे. भारतीय उपखंडात असे काही घडून येण्याची शक्यता नाही. येथे एकत्र येण्याच्या प्रक्रियेतदेखील हिंसा होण्याची शक्यता आहे आणि एकत्र येऊन पुन्हा विभक्त होऊ घातले तर केवढा रक्तपात होईल याची कल्पना करणेही अशक्य आहे. परंतु फाळणीविषयक हा दृष्टिकोन वगळला तर एरवी डॉ. लोहियांनी किंवा समाजवाद्यांनी पाकिस्तानबाबत कधीकधी खंबीर धोरण स्वीकारल्याचेदेखील दिसून येईल. कच्छवर पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा समाजवाद्यांनी आणि डॉ. लोहियांनी पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याची मागणी केली. कच्छचा काही माग पाकिस्तानला देण्याच्या आंतरराष्ट्रीय निवाड्याविरुद्ध समाजवाद्यांनी सत्याग्रह केला. बांगला देशच्या मुक्तिसंग्रामात मन:पूर्वक पाठिंबा दिला आणि त्या देशाच्या स्वातंत्र्याचे स्वागतही केले.

 मी वर म्हटल्याप्रमाणे समाजवाद्यांनी दंगली शमविण्याच्या कामी नेहमीच पुढाकार घेतला आहे. समाजवादी पक्षाच्या अल्पसंख्यांकांविषयीच्या उदारमतवादी धोरणाचा हा परिपाक होता. परंतु अनेकदा या धोरणाला समतोल राहत नसे. अनेकदा समाजवादी पक्षाने मुस्लिम लीगशी निवडणुकीत समझोता केला आहे. विशेषत: १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मजलिस-ए-मुशावरतबरोबर समाजवाद्यांचाही समझौता होता. (अर्थात समाजवाद्यांनी हिंदू

२००/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान