पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/188

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


ते समानतेच्या भूमिकेवरून मुस्लिमांना एकात्म राष्ट्रात अंतर्भूत करण्याचे स्वप्न पाहत होते.
 नेहरूंच्या काही उद्गारामुळे त्यांच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण होण्यास साहाय्य झाले आहे. अनेकदा त्यांनी उर्दूबद्दल केलेली विधाने नेहरूंच्या मुस्लिमधार्जिणेपणाचे द्योतक म्हणून उद्धृत केली जातात. हैदराबाद संस्थानाविषयी त्यांनी काढलेले उद्गारही असेच अनेकांना हत्यार म्हणून वापरता आले आहेत. उर्दूसंबंधी, ही भारतीय भाषा आहे, तिला नष्ट करण्याची भाषा बोलणे चुकीचे आहे, तिला तिचे योग्य स्थान दिले पाहिजे असे नेहरू वारंवार म्हणाले होते. वस्तुतः या उद्गारांत मुस्लिमधार्जिणेपणा कुठे आहे हे कळणे कठीण. आहे. उर्दू ही भारतीय भाषा आहे ही वस्तुस्थितीच आहे आणि ज्यांची उर्दू मातृभाषा आहे त्यांना उर्दूतून शिक्षण घेता आले पाहिजे आणि त्या भाषेचा विकास करण्याची संपूर्ण संधी दिली पाहिजे ही भूमिका एका सच्च्या लोकशाहीवाद्याची आहे. परंतु उर्दूला नामशेष करू इच्छिणाऱ्यांना नेहरूंची ही भूमिका मुस्लिमधार्जिणेपणाची वाटावी यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. परंतु एकीकडे उर्दूचे न्याय्य स्थान नाकारण्याची भूमिका घेतलेले हिंदूतील काही हिंदीप्रेमी आणि दुसरीकडे उर्दूला दुय्यम राज्यभाषा करण्याची मागणी करणारे मुस्लिम आततायी यांच्या रस्सीखेचीत नेहरूंची भूमिका आपल्याला अनुकूल आहे असा आततायी मुसलमान मंडळींनी समज करून घेतला आणि ती मुस्लिमधार्जिणी असल्याचा ग्रह आततायी हिंदू हिंदीभाषिकांचा झाला आणि हा समज कायम रहावा असे नेहरूंनीही हेतुपूर्वक प्रयत्न केले. कधी कधी ते म्हणत, “तुम्ही उर्दूवर अन्याय करणार काय?" यातील 'तुम्ही' म्हणजे कोण असा प्रश्न उपस्थित होतो. बहुधा उत्तर प्रदेशच्या काँग्रेसमधील उद्वेष्ट्या हिंदीवाल्यांना उद्देशून ते हे म्हणत असावेत. मुस्लिम नेत्यांनी आपल्या आततायी मागण्या केल्या नसत्या, उर्दूला उत्तर प्रदेशात आणि दुसऱ्या राज्यात दुय्यम राज्यभाषेचा दर्जा मागितला नसता आणि उत्तर प्रदेशचा हा भाषिक प्रश्न सर्व भारतीय मुसलमानांचा भाषिक प्रश्न बनविला नसता तर उत्तर प्रदेशीय मुसलमानांना उर्दूच्या न्याय्य स्वरूपातील मागणीचा प्रश्न यशस्वीरीत्या सोडविता आला असता. परंतु आपल्या आततायी मागण्यांना नेहरूंचा पाठिंबा आहे असा गैरसमज त्यांनी करून घेतला आणि मुसलमानांतील गोड भ्रम कायम राहावा याची दक्षता नेहरूंनी . सतत बाळगली. नेहरूंच्या राजकारणी नीतीचा हा एक भाग होता.

 अनेक चुकीचे भ्रम त्यांनी पद्धतशीरपणे पसरविले होते. आधीच्या १९३० च्या काळात विपन्नावस्थेत असलेली मुस्लिम लीग काही खऱ्या-खोट्या गा-हाण्यांवर कशी पोसली गेली हे त्यांनी पाहिले होते. मुस्लिम समाज किती चटकन राजकीय व्यासपीठावर एकत्र येतो हे त्यांना जाणवले होते आणि म्हणून अनेकदा आपणच थोडीशी मस्लिम जातीयवादी मागण्यांना अनुकूल अशी भूमिका घ्यावयांची, त्या भूमिकेचा उच्चार करावयाचा, मात्र त्या भूमिकेची अंमलबजावणी करावयाची नाही आणि अशाप्रकारे मुसलमानांना संभ्रमात ठेवून त्यांना भारतीय राजकारणात एक प्रबळ राजकीय पक्ष निर्माण करण्यापासून परावृत्त करावयाचे अशी ही भूमिका होती. म्हणूनच हैदराबादचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे; या राज्याचे विभाजन होऊ नये असे त्यांनी म्हटले, मात्र प्रत्यक्षात भाषावर पुनर्रचना समितीने हैदराबाद राज्याच्या विभाजनाची केलेली सूचना त्यांनी मान्य केलेली आहे. बहुधा मुसलमानांना

समारोप /१८७