पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/187

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुम्हाला कटू फळे भोगायला त्यांनी ठेवले आहे." परंतु नेहरूंनी लागलीच या मित्रांना आवरले. त्यांना या विषयावर अधिक बोलू दिले नाही.) मुसलमानांना मानसिकदृष्ट्या बदलत्या परिस्थितीशी जुळते घेण्यास सोपे जावे म्हणून त्यांनी हे राज्य धर्मातीत राहील या घोषणेचा पुन्हा पुन्हा उच्चार केला. आपल्या मंत्रिमंडळात मुस्लिम सहकाऱ्यांचा समावेश केला. दंगलींविरुद्ध खंबीर भूमिका सतत घेतली आणि क्रोकर यांच्या म्हणण्याप्रमाणे पात्रता नसतानाही अनेक मुसलमानांना मोठमोठ्या जागा दिल्या.
 परंतु हे सर्व करीत असताना ह्या धोरणाला एक निश्चित दिशा देण्याचेही कार्य त्यांनी केले. घटनासमितीच्या कामकाजाचे वृत्तांत आपण पाहिले की वेगळे मतदारसंघ रद्द करताना, नोकऱ्यांतील खास प्रतिनिधित्व नष्ट करताना आणि घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांत समान नागरी कायद्याचे उद्दिष्ट घालताना नेहरूंनी घेतलेल्या सुस्पष्ट भूमिकेचे दर्शन घडते. विशेषतः समान नागरी कायद्यातून (कायदा होईल तेव्हा) मुस्लिमांना वगळण्यात यावे या मुस्लिम लीगच्या महंमद इस्माईल या सभासदाने मांडलेल्या उपसूचनेवर भाष्य करताना त्यांनी सामाजिक कायद्याची धर्माशी गल्लत करता कामा नये असे उद्गार काढले.
 १९५२ साली हिंदू कायदा अस्तित्वात आला. केवळ हिंदूंसाठी कायदा का बदलण्यात आला? मुसलमानांचा कायदा का बदलला नाही? याचे उत्तर त्यांनी मेन्दे या फ्रेंच पत्रकाराला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत सांगितले आहे. ते म्हणतात, मुसलमानांना त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर काही लादण्यात येत आहे असे वाटू नये, म्हणून आम्ही मुस्लिम कायदा बदलला नाही. त्यांच्यात सुधारणा मागणारा वर्ग निर्माण झाल्याखेरीज हे पाऊल उचलण्यात अर्थ नाही असे ते म्हणाले. त्याआधी १९५२ साली नोंदणीविवाहविषयक कायद्यात बदल करण्यात आला व कोणाही व्यक्तीला तिचा धर्म पाळून नोंदणीपद्धतीने विवाह करण्याची सवलत या कायद्याने उपलब्ध करून दिली. (तत्पूर्वी नोंदणीपद्धतीने विवाह करताना मी कोणताच धर्म पाळीत नाही असे लिहून द्यावे लागत असे.) नेहरू याच सुमाराला मद्रासला गेले असताना तेथे नोंदणीविवाह कायद्याच्या या दुरुस्तीविरुद्ध लीगवाल्यांनी निदर्शने केली. लीगवाल्यांच्या मते बदललेल्या कायद्यानुसार मुसलमानदेखील नोंदणीपद्धतीने विवाह करतील. मुसलमानाने विवाहाच्या वेळी मुस्लिम धर्मविधी न करणे हा शरियतचा भंग होतो असे मुस्लिम लीगवाल्यांचे म्हणणे होते. त्यांच्या शिष्टमंडळाला नेहरूंनी रागारागाने 'शरियत कायदा मला कळतो' असे उत्तर दिले.

 आणि तरीही नेहरू हे मुस्लिमधार्जिणे होते, किंबहुना मुस्लिम राजकारणाचे स्वरूप त्यांना कळले नाही असा समज काही लोकांत पसरलेला आहे ह्या प्रश्नाच्या संदर्भात नेहरूंचे जे एकंदर वर्तन होते आणि त्यांनी ज्या भूमिका वेळोवेळी घेतल्या होत्या त्या पाहिल्या की मुस्लिम मनाच्या ठेवणीचे ऐतिहासिक स्वरूप त्यांच्याच नीट लक्षात आले होते असे वाटू लागते. प्रथमपासून त्यांनी वेगळ्या मतदारसंघाला विरोध केला आहे, मुस्लिम लीगच्या राजकारणाला सतत विरोध केला आहे. पाकिस्तानलाही विरोध केला आणि त्याचबरोबर मुस्लिमांना समानता देण्याच्या भूमिकेला ते सतत चिकटून राहिले. या दोन भूमिका अनेकदा परस्परविसंगत वाटतात. पण त्या तशा नव्हत्या. मुस्लिम विभक्तपणाला विरोध करीत असतानाच

१८६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान