पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/184

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ज्यूंबद्दल जनसंघाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना फारसे प्रेम आहे असे मानण्याचे कारण नाही. हिटलरने ज्यूंच्या केलेल्या अमानुष कत्तलीचे गोळवलकरांनी समर्थन केले हे याआधी मी लिहिलेच आहे. परंतु तेव्हा झगडा आर्य (जर्मन) आणि सेमेटिक (ज्यू) असा होता. शिवाय जर्मनीच्या लोकसंख्येत ज्यू अल्पसंख्यांक होते. आर्य वंशश्रेष्ठत्वाच्या अहंकाराने पछाडलेल्या गोळवलकरांनी हिटलरच्या कृत्यांचे समर्थन करावे यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. शिवाय ज्यू अल्पसंख्यांक होते आणि अल्पसंख्यांकांचे निर्दालन करण्यात गैर काहीच नाही असे ते मानीत होते. परंतु हिंदुतदेखील ब्राह्मण हेसुद्धा अल्पसंख्यांक आहेत हे गोळवलकर सोयीस्करपणे विसरलेले दिसतात. आणि सर्व हिंदू आर्यवंशाचे नाहीत हे (इतिहासाचे साधे ज्ञानही त्यांनी आत्मसात केलेले नव्हते) अल्पसंख्यांक जमातींच्या निर्दालनाचे तंत्र कधीतरी हिंदू समाजातील उच्चवर्णीय अल्पसंख्यांकांवर उलटेल याचा जनसंघाने विसर पडू देता कामा नये. महाराष्ट्रात गांधीजींच्या खुनानंतर ब्राह्मणविरोधी दंग्यांची लाट उसळली होती. त्यावेळी गांधीजींच्या अनुयायांनीच मराठ्यांना आवरले म्हणून ब्राह्मण वाचले. कत्तलीचे प्रश्न सोडविण्याची ईर्ष्या बाळगणाऱ्यांनी स्वत:च्या कत्तली होतील तेव्हा तक्रारी करू नयेत आणि अल्पसंख्यांकांविषयी अढी बाळगू नये. ज्यूंविषयी पुढे म्हणायचे तर इस्रायल झाल्यानंतर आधीचे चित्र बदलले. आता संघर्ष ज्यू आणि मुसलमान असा सुरू झाला आणि जनसंघाची सहानुभूती इस्रायलकडे वळली. पॅलेस्टाईनी अरबांना ज्यूंनी हाकलून देण्यात गैर काही नाही असे ते म्हणू लागले. जनसंघाच्या अल्पसंख्यांकांविषयीच्या ध्येयधोरणात हे चपखल बसते. जर्मनीत ज्यू अल्पसंख्यांक होते तेव्हा तेथून त्यांना हाकलून देणे योग्य होते आणि पॅलेस्टाईनमध्ये अरब अल्पसंख्यांक आहेत म्हणून त्यांना हाकलून लावण्यात गैर काही नाही. तत्त्व, न्याय इत्यादी गोष्टींचा यात मागमूसदेखील आढळत नाही याचे आश्चर्य वाटावयास नको. कारण बहुसंख्यांकांचे एकसंध राष्ट्र बनविणे या महान उद्दिष्टासाठी केलेली कोणतीही कृत्ये क्षम्य ठरतात, अशी ही भूमिका आहे. 'एव्हरीथिंग इज नेशन' असे हिटलर म्हणाला होता, त्याची ही सुधारून वाढविलेली आवृत्ती आहे. अर्थात याला पाकिस्तानचे हिंदू मात्र अपवाद आहेत. त्यांना हाकलून देण्यात पाकिस्तानने अन्याय केला आहे असे जनसंघाचे मत आहे.

 अनेकदा जनसंघाचे वरिष्ठ नेते ज्या भूमिका मांडतात, त्यांच्या नेमके विरूद्ध वर्तन काही दुय्यम कार्यकर्ते करीत असतात. आंतरधर्मीय लग्ने झाली पाहिजेत असे जनसंघाचे काही वरिष्ठ नेते खासगीत बोलताना माझ्यापाशी म्हणाले, परंतु पुण्याला झालेल्या एका हिंदु-मुस्लिम आंतरधर्मीय विवाहाच्या वेळी विरोध व निदर्शने करण्यात जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी पुढाकार घेतला होता. या विसंगतीचे कारण तरी कोणते? जनसंघात आलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकर्त्यांच्या संच जनसंघाच्या बदलत्या व्यापक विचार करण्याच्या धोरणाशी जुळते घ्यावयास तयार नाही, की जनसंघाच्या दुटप्पीपणाचा हा एक भाग आहे? बाहेर भूमिका परिस्थितीनुसार सोयीस्कर ती घ्यायची आणि कार्यकर्त्यांचा गुप्त बैठकीत आणि बौद्धिक वर्गातून आपल्या खऱ्या ध्येयधोरणाचे सिद्धांत मांडावयाचे, असे तर होत नाही ना? यातील कोणतेही कारण बरोबर असू शकेल. परंतु जोपर्यंत ही विसंगती

हिंदुत्ववाद/१८३