पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/183

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


दोन्ही देशांतील हेर एकमेकांच्या देशात हेरगिरी करीत असतीलही. परंतु देशातील प्रत्येक मुसलमान पाकिस्तानची हेरगिरी करीत असतो अशी जनसंघाच्या दुय्यम कार्यकर्त्यांची भूमिका आहे. जनसंघाचे वरिष्ठ नेते मुस्लिम समाजाशी एकात्मता घडवून आणली पाहिजे असे अधूनमधून ओरडताना दिसतात. प्रत्येक मुसलमानाला हेर समजून ते ही एकात्मता कधी घडवून आणणार आहेत? आणि एवढ्या प्रचंड प्रमाणात हेरगिरी चालू असताना भारत सरकारचे हेरखाते काहीच करीत नाही हे कसे? इतके असंख्य ट्रान्समीटर सरकार कशाकरिता चालू ठेवील? सरकारी हेरयंत्रणेला त्याचा सुगावाच लागत नाही असे समजायचे काय? या माझ्या प्रश्नांवर जनसंघाच्या कार्यकर्त्याने मोठे मजेदार उत्तर दिले. तो म्हणाला, “हे सरकार मुस्लिमधार्जिण्या हिंदूंचे आहे. यामुळे ते त्यांची गय करत आहेत." याचा एक निष्कर्ष असा निघतो की जे हिंदू जनसंघात नाहीत ते हिंदू देशद्रोही आहेत. येथे पाकिस्तानच्या चळवळीच्या काळात 'मुसलमान हो तो मुस्लिम लीग में आवो।' या जीनांनी दिलेल्या घोषणेची आठवण येते.

 राष्ट्रप्रेमी हिंदू तेवढा जनसंघात असतो असे म्हटल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष फक्त जनसंघ - आहे ही भूमिका ओघानेच आली. आपले तेवढे राष्ट्रवादी आणि इतर तेवढे राष्ट्राचा द्रोह करणारे या भूमिकेचा अहंकार जनसंघाच्या प्रत्येक कार्यकर्त्यात दिसून येतो. यामुळे जनसंघाने सतत उग्र राष्ट्रवादी भूमिका घेतलेली आहे. परदेशाबरोबरचा सीमा तंटा असो किंवा कसलाही आंतरराष्ट्रीय तंटा असो, जनसंघ उग्र राष्ट्रवादी भूमिका घेत आलेला आहे. परराष्ट्रधोरणावरील जनसंघाची भूमिकादेखील अशीच उग्र राष्ट्रवादाच्या पायावर उभी असलेली आणि मुस्लिमद्वेषाच्या पार्श्वभूमीने भारलेली दिसते. एरवी इस्रायलचे अवास्तव स्तोम माजविण्याचा प्रयत्न जनसंघाने केला नसता. वास्तविक जनसंघाने पॅलेस्टाईनच्या अरबांच्या इस्रायल नष्ट करण्याच्या आणि सबंध पॅलेस्टाइनला एकत्र आणण्याच्या भूमिकेला पाठिंबा द्यायला हवा होता. कारण इस्रायल व पाकिस्तान ही धर्माच्या आधारे झालेली दोन राष्ट्रे आहेत. या दोन राष्ट्रांच्या निर्मितीतही पुष्कळ साम्य आहे. दोन्ही राष्ट्रांनी अनुक्रमे आपल्या देशातील अरबांना आणि हिंदूना हाकलून दिले आहे. पाकिस्तानातून हाकलून दिलेल्या हिंदूंचा कैवार घेणाऱ्या जनसंघाने वास्तविक पॅलेस्टाईनच्या निर्वासितांकडे सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे होते. १९५० साली पाकिस्तानातून निर्वासित आल्यानंतर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पाकिस्तानकडे प्रदेश मागावा अशी सूचना केली होती. १९७१ मध्ये याह्याखानांनी अत्याचार सुरू केल्यानंतर तेंव्हाच्या पूर्व बंगालमधून सुमारे एक कोटी निर्वासित भारतात आले. बांगला देशाच्या मुक्तीसाठी आपण सरळ तेथे सैन्य धाडले आणि या निर्वासितांची परत रवानगी केली. (जनसंघाने या सर्व कृत्यांना पाठिंबा दिलेलाच आहे.) परंतु इस्रायल-अरब वादात मात्र जनसंघ इस्रायलची बाजू उचलून धरतो. जनसंघाच्या या विसंगतीचे कारण इतकेच आहे की बिचारे पॅलेस्टाईनचे गरीब निर्वासित हे मुसलमान आहेत. हा अर्थात त्यांचा गुन्हा आहे आणि मुसलमानांच्या न्याय्य गा-हाण्यांनादेखील विरोध करणे हे आपले परम कर्तव्य आहे अशीच ही जनसंघाची भूमिका आहे.

१८२/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान