पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/185

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अस्तित्वात आहे तोपर्यंत जनसंघाच्या मुसलमानांविषयीच्या ध्येयधोरणाबद्दल शंका राहणार, नाही.
 आता मुस्लिमप्रश्नाने पछाडले जाण्याची जनसंघाला फारशी आवश्यकता नाही. मुस्लिम-प्रश्न हा आता फार तीव्र बनू शकणार नाही. आर्थिक प्रश्न हा अतिशय उग्र बनला आहे आणि दिवसेंदिवस बनत जाणार आहे. अर्थव्यवस्थाच दुबळी झाली. देशात अन्नान्न दशा झाली, तर मात्र इतर सर्वच प्रश्न तीव्र बनतील आणि म्हणून आर्थिक प्रश्नांवर सर्वच पक्षांनी अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जनसंघाजवळ स्पष्ट आर्थिक धोरणाचा अभाव आहे. कोट्यवधी गरीब जनतेला दिलासा देण्यासारखी कोणतीही आर्थिक विचारसरणी जनसंघापाशी नाही. शिवाय हिंदू सनातनी वर्ग हा जनसंघाचा प्रमुख पाठीराखा आहे. त्यामुळे अधूनमधून पाकिस्तान हल्ला करणार असल्याची एखाद्या नेत्याने घोषणा करणे, मुसलमान दंगलीकरिता प्रचंड शस्त्रसाठा करीत असल्याच्या भडक बातम्या छापणे, मुस्लिम प्रश्नांवर सतत तंग वातावरण ठेवणे, अशा प्रकारचे धोरण जनसंघ सतत ठेवीत आलेला आहे. साधारणत: हिंदू सनातनीपणा आणि औद्योगिक मागासलेपणा यांचे मिश्रण असलेल्या हिंदी भाषिक प्रदेशातच जनसंघाचे सामर्थ्य का आहे हे यावरून लक्षात येते. परंतु जनसंघाला दक्षिणेत हातपाय पसरण्याचीदेखील ईर्ष्या आहे आणि अखेरीला सत्तेवर यावयाचे आहे. हिंदूंतील दलित जमाती आणि अल्पसंख्यांक याविषयींचे जनसंघाचे धोरण बदलल्याखेरीज जनसंघाला सत्तेवर येण्याची काहीच आशा नाही.









१८४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान