पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/164

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेत्यांचा अंदाज तसा चुकीचा नाही. मला कलकत्त्याला एक बंगाली गृहस्थ बांगला देशचा लढा चालू असताना भेटले. ते हिंदू होते, म्हणूनच ते पुरेसे भावनिक अखंड हिंदुस्थानवादी होते. त्यांच्या पत्नी फ्रेंच होत्या आणि म्हणून बहुधा या प्रश्नाकडे अधिक तटस्थतेने पाहू शकत होत्या. ते गृहस्थ मला म्हणाले, "It will be better if this sub-continent comes together in a confederation." मी उत्तरलो, "In that case I will publicly oppose it." आश्चर्यचकित होऊन त्यांनी मला विचारले. "Why? Are you Muslim?" मी होय म्हणालो. त्यांनी पुढे विचारले, "Are you afraid of Hindu domination?" मी म्हणालो, "No, I am afraid of Muslim domination." त्यांच्या पत्नी जोरजोराने हसल्या आणि म्हणाल्या, 'आय सी युवर पॉईंट.' अजून एकत्र येण्याची वेळ आलेली नाही. हिंदूंनी त्याकरिता घाई करू नये. या प्रश्नाचा भावनात्मक विचार करणे पुन्हा तितकेच चुकीचे ठरेल.
 निदान सध्या तरी उपखंडात तीन स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रे उदयाला आली आहेत. त्यांच्या राष्ट्रवादाच्या प्रेरणा परस्परांहून वेगळ्या आहेत. त्या तशा आहेत म्हणून अस्वस्थ होण्याचे कारण नाही. नजिकच्या भविष्यकाळात भारत आणि बांगला देश यांचे संबंध चांगले राहतील, परंतु पाकिस्तान आणि बांगला देशमधील भारतविरोधी लोक व नेते या संबंधांत पाचर मारण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता कमी आहे. भारतीय मुसलमानांतील जातीयवादी नेते आणि पक्ष यांचा प्रयत्न भारतीय मुसलमानांना जातीय व्यासपीठावर संघटित करण्याचा राहणार आहे. हे प्रयत्न गेली अनेक वर्षे चालूच आहेत. परंतु आता मुस्लिम लीग ते अधिक जोरकसपणे करू लागली आहे. उत्तर भारतात मुस्लिम लीग ही संघटना उभारणे हा त्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या प्रयत्नांना वरवर विरोध करणाऱ्या मुस्लिम व्यक्ती आणि संघटना वस्तुत: जातीयवादीच आहेत. डॉ. फरिदी यांनी स्थापन केलेली 'मजलिस' ही त्यांतील एक संघटना जातीयवादीच आहे. मजलिसचे नेतृत्व करण्यात फरिदींचा हिशेब साधा सरळ होता. लीग एकेकाळी बदनाम झालेली आहे. तिचे पुनरुज्जीवन झाल्यास उत्तर प्रदेशात प्रचंड तणाव निर्माण होईल. यापेक्षा लीगचेच जातीयवादी राजकारण मजलिसच्या नावानेच केले तर ते सोईस्कर ठरेल असे त्यांना वाटते. एरवी त्यांच्या मागण्या आणि मुस्लिम लीगच्या मागण्या यांत कोणताच फरक नाही.
 उत्तर प्रदेशात १९७४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिम लीगने काँग्रेसला आणि मजलिसलादेखील आव्हान देण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मुस्लिम लीगचा फक्त एक उमेदवार उत्तर प्रदेश विधानसभेत निवडून आला. एक तर मुसलमानांची मते विभागली गेली आणि मजलिसने भारतीय क्रांतिदलाला साथ दिली. उत्तर प्रदेशात आपला झेंडा रोवता आला नाही म्हणून लीगवाले निराश होतील असे नव्हे. संघटना अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न होतच राहणार. विशेषतः उत्तर भारतात मुस्लिम लीगचे पुनरुज्जीवन होणे लीगच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्याचा मुस्लिम समाजावर होणारा मानसिक परिणाम लीगच्या नेत्यांना कळू शकतो.

 हा प्रयत्न वगळला तर बांगला देशच्या उदयानंतर मुस्लिम जातीयवादी शक्तींचा आक्रमकपणा किंचित कमी झाला आहे असे जाणवते. याचा अर्थ मुस्लिम जातीयवादी

भारतीय मुसलमान /१६३