पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/163

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठेवण्याचे यश आपण कराराने कमविले आहे. पाकिस्तानच्या हेतूंची खरी कसोटी पाकिस्तानच्या प्रदेशातून भारतीय सैन्य मागे हटल्यावर लागेल. यात थोडा धोका पंतप्रधानांनी पत्करला आहेच. परंतु करार न करण्याचा व अडून बसण्याचा पर्यायदेखील तितकाच धोकेबाज व अधिक खडतर होता हे पंतप्रधानांनी जाणले. याचा अर्थ पाकिस्तानच्या सत्प्रवृत्तीवर पंतप्रधानांचा विश्वास बसला असे होत नाही, अशी भूमिका कराराच्या नि:पक्षपाती टीकाकारांची आहे. परंतु अशा प्रकारची तटस्थ भूमिका कराराच्या मुस्लिम समर्थकांनी घेतलेली नाही. पाकिस्तान नेहमीच भारताबरोबर सदिच्छेने राहिले आहे. भारताचे पाकिस्तानाविरोधी नेतृत्व हाच भारत-पाक तडजोडीला अडथळा आहे हीच ज्यांची भूमिका आहे. त्यांनी कराराचे समर्थन कोणत्या भूमिकेतून केले याची कल्पना करण्यासारखी आहे. म्हणूनच या कराराचे स्वागत करणारा जो लेख मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागप्रमुख श्रीमती अलू दस्तूर यांनी लिहिला. (पहा - 'Quest' - प्रस्तुत लेखकाची भूमिका श्रीमती दस्तूर यांच्या लेखातील भूमिकेशी जुळती आहे. त्याकरिता प्रस्तुत लेखकाचा 'महाराष्ट्र टाइम्स' मधील लेख पहावा.) त्यात, 'सर्वच भारतीय मुस्लिम नेत्यांनी कराराचे स्वागत करावे ही अस्वस्थ करणारी बाब आहे' असे सूचक वाक्य लिहिले आहे.

 या बदललेल्या सत्तासमतोलाचे वेगळेच परिणाम भारतीय मुस्लिम समाजावर होणार असल्याची आता चिन्हे दिसू लागली आहेत. उलेमांची आधीची भूमिका मुसलमानांचे एकत्रित दडपण हिंदूवर ठेवण्यासाठी अखंड हिंदुस्थान असावा ही होती. सुशिक्षितांनी राजकीय वेगळेपणाचा सिद्धांत बाळगून वेगळी मायभूमी घेतली तेंव्हादेखील पाकिस्तानच्या सामर्थ्याचे दडपण भारतीय मुसलमानांच्या मागे हिंदूंविरुद्ध उभे राहील ही भूमिका होती. आता पाकिस्तान कोलमडल्यानंतर दडपणाचा सिद्धांतही नेस्तनाबूत झाला आहे. उपखंडातील मुस्लिम समाज तीन राष्ट्र प्रदेशांत विभागला गेला आहे. यातील बांगला देशमध्ये राष्ट्रउभारणीचा सगळा भर बहुसंख्य जनता इस्लाम धर्माची आहे ह्यावर न राहता, सर्व जनता बंगालीभाषिक आहे ह्यावर राहणार आहे; बांगला देशातील जनतेच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांवर आहे. यामुळे भारतीय मुसलमानांच्या हिताच्या रक्षणाची भाषा तो देश बोलणार नाही. उरलेल्या भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचा विचार करता पाकिस्तानपेक्षा भारतातील मुसलमानांची संख्या अधिक भरते. जो मोठा गट आहे त्याच्या रक्षणाची भूमिका छोटा गट घेईल ही कल्पनाही भारतीय मुसलमानांनादेखील हास्यास्पद वाटेल. याचाअर्थ उपखंडातील तथाकथित मुस्लिम हितसंबंधांची जपणूक करण्याची जबाबदारी उपखंडातील सर्वात मोठा मुस्लिम गट या नात्याने भारतीय मुसलमान आपल्याकडे घेणार असे दिसते. यामुळेच येथे उपखंडाच्या एकीकरणाच्या किंवा संघराज्यासारख्या एकत्र आणण्याच्या योजनेचा पुरस्कार भारतीय मुसलमान करू लागण्याचा संभव आहे. कारण त्यायोगेच उपखंडातील सोळा कोटी मुस्लिम समाज पुन्हा एकत्र येऊ शकतो. तरच हिंदूंवर दडपण आणता येते. याची साक्ष - अब्दुल गफूर नूराणी यांनी बांगला देशाचा लढा सुरू झाल्यानंतर लिहिलेल्या एका लेखात संघराज्याचा पुरस्कार केलेला आहे. हिंदूंच्या मनात अखंड हिंदुस्थानविषयी असलेली भावनात्मक ओढ उपखंडातील मुस्लिम समाजाला एकत्र जोडावयास उपयोगी पडेल असे त्यांना वाटते, हा

१६२/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान