पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/165

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


पक्षांनी आपले पक्ष गुंडाळले आहेत अथवा कार्य बंद केले आहे असा नव्हे. आक्रमक राजकारण करण्यासाठी अनुकूल संधींची वाट ते बघत आहेत. संध्या तरी बांगला देशमध्ये भारतविरोधी भावना निर्माण झाल्या तर त्याबद्दल या जातीयवादी गटांना आनंद होतो हे रेडियन्स'सारखे पत्र नजरेखालून घातले की लक्षात येते.
 दरम्यान काश्मीरमध्ये काही नव्या घडामोडी होऊ लागल्या आहेत. शेख अब्दुल्लांच्या भारत सरकारबरोबर समझौत्याच्या वाटाघाटी होऊ लागल्या, मुस्लिम लीगला विरोधी अशी भूमिका शेख अब्दल्लांनी घेतली, सार्वमताचा आग्रह आपण धरीत नाही असे त्यांनी जाहीर. केले आणि काश्मीरचे भारतातील सामिलीकरण आपल्याला मान्य आहे अशी घोषणा केली. यामुळे आतापर्यंत काश्मिरी जनतेला न्याय दिला पाहिजे असे म्हणून अब्दुल्लांना पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम पक्षांनी अब्दुल्लांवर टीका करावयास प्रारंभ केला. अब्दुल्ला हे काँग्रेसच्या आहारी गेलेले आहेत असे आता सांगण्यात येऊ लागले.
 आजच्या बदललेल्या परिस्थितीत भारतातील सर्वच मुसलमानांना एकाच राजकीय व्यासपीठावर आणता येणार नाही हे कोणत्याच मुस्लिम पुढाऱ्याने समजून घेतलेले नाही. एक तर त्यांचे प्रश्न भिन्न आहेत. प्रत्येक ठिकाणचे मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण भिन्न आहे आणि परिस्थिती सर्व ठिकाणी सारखी नाही. जम्मू व काश्मीरमध्ये मुसलमानांची संख्या अधिक आहे आणि म्हणून तेथे अन्यायाचा प्रश्न नसतो, तर तेथे वेगळे होण्याच्या प्रश्नाला महत्त्व असते. केरळात संघटित तिसरी शक्ती या न्यायाने सत्तेत भागीदार होण्याचे तत्त्व मुस्लिम लीगने स्वीकारले आहे. उत्तर प्रदेशात मजलिस हेच करू पाहते आहे. परंतु डॉ. फरिदी यांच्या मृत्यूनंतर आता ती विस्कळीत होणे अपरिहार्य आहे. याचा फायदा उत्तर प्रदेशात मुस्लिम लीग घेईल की काँग्रेस आणि इतर धर्मनिरपेक्षवादी पक्ष घेतील हे आज सांगता येणे कठीण आहे.
 मुस्लिम जातीयवादी शक्तीबद्दलचे हे विवेचन करीत असतानाच मुस्लिम समाजातील, अत्यंत क्षीण का होईना, अस्तित्वात असलेल्या पुरोगामी आणि व्यापक अशा आंदोलनांचाही या संदर्भात विचार होणे आवश्यक आहे. मुस्लिम समाजाच्या मनोवृत्तीत आवश्यक बदल घडवून आणणे, त्याला या बदललेल्या परिस्थितीशी जुळते घेण्यास सोयीचे व्हावे म्हणून मानसिक पार्श्वभूमी तयार करणे, मुस्लिम जातीयवादावर सरळ हल्ला करणे आणि कृतिशील पुरोगामी चळवळी करणे अशा विविध मार्गांनी व्यापक पुरोगामी स्वरूपाचे हे आंदोलन मुस्लिम समाजात मूळ धरू पाहत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत इस्लाम, इस्लामचा इतिहास, इस्लामी धर्मशास्त्र, इस्लामी कायदा आणि हिंदु-मुस्लिम प्रश्न इत्यादींवर मोठ्या प्रमाणात लिखाणं भारतात प्रसिद्ध होऊ लागले आहे. एक प्रकारे या प्रश्नावर विचारमंथन होत आहे ही आशास्पद बाब आहे. यातील बरेचसे लिखाण मुस्लिम लेखकांनी केलेले आहे आणि त्यात आता बदलाची जाणीव दिसून येऊ लागलेली आहे. (आय. मुजिब यांचे 'इंडियन मुस्लिम', मोइन शाकीर यांचे 'खिलाफत टू पार्टिशन', एम.आर.ए. बेग यांचे; आणि फैझी यांचे 'रिफॉर्म इन मुस्लिम पर्सनल लॉ ही याची काही उदाहरणे आहेत.)

 जामियामिलिया ही शिक्षणसंस्था याच उदात्त प्रेरणेने चालविली गेली. तेथे आता ए.

१६४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान