पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/148

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अँड सन्स, मुंबई.) या पुस्तकात त्यांनी पाकिस्तानच्या असत्य प्रचाराची तळी उचलून धरली आहे. भारताने काश्मीरमध्ये वचनभंग केला असे या पुस्तकात नूराणी प्रतिपादन करतात. ज्या पद्धतीने त्यांनी जुनागडचा प्रश्न पुस्तकात चर्चिला आहे त्यावरून नूराणींचे पाकिस्तानप्रेम कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊ शकते याचा अंदाज लागू शकतो. जीनांनी सतत संस्थानिकांच्या सार्वभौम हक्कांची तरफदारी केली, याबाबत नूराणींनी जीनांवर कुठेही टीका केलेली नाही. जुनागड सामील करून घेऊन जीनांनी संस्थानिकांना सामील करून घेण्याचा जो संकेत माउंटबॅटन घालू पाहत होते तो मोडल्याबद्दल त्यांनी जीनांना दोष दिलेला नाही. काश्मीरमध्ये भारताने सैन्य पाठविल्यानंतर जीनांना काश्मीरच्या बहुसंख्यांक जनतेच्या सार्वभौम हक्कांची जाणीव झाली. अर्थात हे बरोबरच आहे. मुसलमान प्रजेला सार्वभौम हक्क असले पाहिजेत, जुनागडच्या हिंदू प्रजेला असण्याचे कारण नाही, असे जीनांचे तर्कशास्त्र होते. नूराणींनी या बाबतीत कुठेही पाकिस्तानला दोषी धरलेले नाही. जीनांप्रमाणे जुनागडच्या प्रजेला हक्क असू शकत नाही असे नूराणींनी मानले तर त्यात आश्चर्य काय? काश्मीर प्रश्नावर जम्मूचे एकेकाळचे समाजवादी कार्यकर्ते श्री. बलराज पुरी यांच्याशी नूराणी यांचा 'जनता' साप्ताहिकात १९६४ साली जो वाद झाला त्या वादात नूराणी यांची पाकधार्जिणी भूमिका पुरेपूर उघडकीला आली. या वादात नूराणींनी पाकिस्तानचे नेते भारतातील नेत्यांपेक्षा अधिक उदारमतवादी. आहेत असे विधान केले आहे. थोडक्यात गांधीजींपासून इंदिरा गांधीपर्यंत भारतीय नेते संकुचित आणि अनुदार होते. मात्र जीनांपासून आयुबखानापर्यंत सर्व पाकिस्तानी नेते विशाल मनाचे आणि भारताशी मैत्री करायला उत्सुक झालेले होते, पाकिस्तानच्या हिंदंना रोज जातीने आयुबखान बिर्याणी वाढीत होते आणि पंक्तीत फिरून 'तकल्लिफ मत करो, पेट भरके खाव' असे हात जोडून विनवीत होते, असे नूराणींनी मुंबईच्या नेपियन सी वरील आलिशान फ्लॅटमध्ये रान भारतीय जनतेला सांगण्याचा उद्धटपणा करणे याखेरीज अधिक संतापजनक बाब असू शकत नाही. स्वत: नूराणी या अनुदार आणि संकुचित नेतृत्व असलेल्या देशात कशाकरिता राहिले आहेत? बहुधा संकुचित व अनुदार हिंदू नेतृत्वाला सुधारण्याची कामगिरी पाकिस्तानच्या वतीने येथे बजावता यावी यासाठी ते येथे राहिले असावेत. परंत बलराज पुरींनी त्यांना फार अडचणीत टाकले. (पहा-साप्ताहिक जनता, १९६५ चे फेब्रुवारी ते ऑगस्टचे अंक.)
 त्यांनी विचारले, "काश्मीरला स्वयंनिर्णयाचा अधिकार दिला गेल्यास नूराणी भारताचे नागरिक म्हणून काश्मिरी जनतेला कुठल्या देशात सामील व्हायला सांगतील, भारतात की पाकिस्तानात?" नूराणींनी यावर अर्थातच उत्तर दिले नाही हे सांगायला नकोच. काश्मिरी जनतेने कुठल्या देशात सामील व्हावेसे नूराणींना वाटते हा प्रश्न, नूराणी ज्याअर्थी स्वयंनिर्णयाचा आग्रह धरीत होते त्याअर्थी, अप्रस्तुत आहे. स्वयंनिर्णयाचा आग्रहच मुळी काश्मीर पाकिस्तानात सामील व्हावे याकरिता आहे.

 परंतु १९६४ नंतर या प्रश्नाला कलाटणी मिळाली. पाकिस्तानने १९६५ मध्ये काश्मीरात हल्लेखोर घुसविले. भारताने काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानशी युद्ध केले. महाराष्ट्र सरकारने या युद्धात नूराणी यांना भारत-संरक्षण कायद्याखाली स्थानबद्ध केले. यांमुळे भारतात काश्मीर

भारतीय मुसलमान /१४७