पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/149

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रश्नावर लॉबी निर्माण करण्याचे नूराणींचे मनसुबे धुळीला मिळाले. अटक झाल्यामुळे नूराणी यांची भूमिकाही बदलली. साधारणत: जातीयवादी मुसलमान भेकड असतातच. १९४६ साली जीनांना अटक होणार अशा बातम्या पसरल्या असताना लंडनहून त्रिपक्ष परिषदेहून परत येताना, अटक होईल या भीतीने, जीना मुंबईला आलेच नाहीत-कराचीला थांबले. कारण सिंधमध्ये मुस्लिम लीगचे मंत्रिमंडळ असल्यामुळे तेथे अटक केले जाण्याची शक्यता नव्हती. जीनांचा भेकडपणा नूराणींसारख्या त्यांच्या अनुयायाने स्वीकारला यात आश्चर्य काहीच नाही. १९७१ ला बांगला देशच्या प्रश्नावर भारत-पाकिस्तान युद्ध झाले. या युद्धात आपल्याला पकडणार म्हणून नूराणींनी गर्भगळित होऊन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री श्री. रफिक झकेरिया यांच्याकडे धाव घेतली आणि पाकिस्तानच्या निषेधाच्या पत्रकावर आपली सही घ्यावी अशी त्यांनी गळ घातली. परंतु युद्धाच्या आधीच काही महिने 'या प्रश्नावर हवे तर युद्ध केले पाहिजे' असे जयप्रकाशजींनी प्रतिपादन केले, तेव्हा फुटकळ नियतकालिकांत लेख लिहून नूराणींनी 'युद्धात किती खर्च येतो?' हा उद्धट प्रश्न जयप्रकाशजींना विचारला. हा प्रश्न इंदिरा गांधींनी युद्ध केले तेव्हा नूराणी विचारू शकले काय? कारण इंदिरा गांधी हातात तलवार घेऊन उभ्या होत्या आणि दांडगटपणा करून प्रतिपक्षाला नमविण्याच्या परंतु समोर तलवार भिडली की शरण जाण्याच्या जातीयवादी मुसलमानांच्या भेकड परंपरेप्रमाणे नूराणी वागले. जीना असेच वागत होते. एकदा वल्लभभाईंनी जयपूर अधिवेशनात 'तलवारीला तलवार भिडेल' असे लीगला उद्देशून उद्गार काढले तेव्हा गांधी-नेहरूंनी त्यांना मागे खेचले. गांधी-नेहरू मूलत; असे सुसंस्कृत होते की असंस्कृत रानटीपणाला रानटीपणे उत्तर देण्याची कल्पनाही ते सहन करू शकत नव्हते. तेंव्हाच्या ऐतिहासिक शक्तीदेखील वेगळ्या होत्या. आता त्या बदलल्या. हे कळण्याची पात्रता व समंजसपणा भारतातील तथाकथित सुशिक्षित मुसलमानांत नाही. मग नूराणीत तो कुठून येणार?

 पाकिस्तानच्या निर्मितीच्या संदर्भात नूराणींचे सर्व प्रतिपादन 'जीनांचे समाधान का केले गेले नाही?' ह्या प्रश्नावर केंद्रित असते. जणू जीनांच्या कोणत्याही अटी मान्य करून भारत एकत्र ठेवण्याची जबाबदारी गांधी-नेहरूंवर होती व त्यांनी ती पार पाडली नाही असे नूराणींना सुचवायचे असते. म्हणून ते फाळणीपूर्व काळातील सर्व घटनांची जबाबदारी गांधी-नेहरूंवर व काँग्रेसवर टाकतात. त्यांनी 'मुस्लिम लीगच्या मागण्या गैरवाजवी होत्या, देशाचे ऐक्य टिकविण्यासाठी मुस्लिम लीगनेदेखील तडजोडी करायला हव्या होत्या' हे कोठेही म्हटलेले नाही हे सूचक आहे. नूराणींच्या या तर्कशास्त्राप्रमाणे जीना जे मागतात ते दिले नाही म्हणून फाळणी झाली. पाकिस्तानला काश्मीर दिला नाही म्हणून ते भांडत राहिले. समजा, काश्मीर दिले गेले असते आणि पाकिस्तानने कॉरिडॉरची मागणी केली असती तर 'ती तुम्ही दिली नाही म्हणून भांडण चालू आहे' असे नूराणींनी आम्हाला सांगितले असते. वस्तुस्थिती अशी आहे की पाकिस्तानच्या सध्याच्या आकाराने पाकिस्तानचे जसे समाधान झाले नव्हते तसेच भारतातील नूराणींसारख्या पाकिस्तानी नेत्यांचेदेखील झालेले नाही. याकरिता काश्मीर पाकिस्तानात जायला पाहिजे आणि भारताने पाकिस्तानशी तडजोड केली पाहिजे असे ते प्रतिपादन करीत असतात. १९७१ च्या युद्धानंतर नूराणींचा सूर

१४८/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान