पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/140

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


पडीक जमीन विपुल होती. मेमनसिंग जिल्ह्याचे मुसलमान शेतकरी अतिशय कष्टाळू आणि मेहनती होते आणि सुरुवातीला तरी आसामच्या हिंदू जमीनदारांनी मेमनसिंगच्या या मुसलमान शेतकऱ्यांना बोलावून उत्तेजन दिले. मग जमिनीकरिता भुकेल्या बंगाली शेतकऱ्यांच्या लाटाच्या लाटा येऊन थडकल्या. आसाममध्ये पहिल्या प्रथम या बंगाली शेतकऱ्यांनी रोख पैसा मिळणारी पिके काढायला सुरुवात केली आणि झपाट्याने आसाममधील मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण वाढू लागले. गंमत अशी की आसाममध्ये मूळचे असे आसामी मुस्लिम फारच थोडे आहेत. एक तर आसाम प्रांत मुस्लिम सत्तेच्या प्रभावाखाली कधी ही आला नाही. औरंगजेबाच्या काळात जेव्हा दोन-तीन स्वाऱ्या करण्यात आल्या तेव्हा मोगलांच्या सैन्याचा आसामच्या अहोम राजांनी पराभव केला आणि ब्रह्मपुत्रेच्या लढाईत मीर जुमलाच्या नौदलाचा पाडाव केल्यानंतर जे हजारो मोगल सैन्यातील शिपाई अहोम सेनापती लछित बरफुकुन याने कैदी केले, त्यांना आसामच्या अंतर्भागात पाठवून देण्यात आले. हे आसामचे पहिले मुस्लिम नागरिक समजले पाहिजेत. (पहा - 'History of Assan') यांनी पुढे आसामी स्त्रियांशी लग्ने केली आणि आसामी नावे धारण केली. पुढे बंगालच्या उत्तर भागातून येणाऱ्या मुसलमान शेतकऱ्यांची त्यात भर पडू लागली. याविरुद्ध आसामी जनतेत हळूहळू असंतोष निर्माण होतच होता. पाकिस्तान योजनेत मुस्लिम लीगने आसामचा समावेश केल्यानंतर आसामात पद्धतशीरपणे मुस्लिम लोकसंख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले. युद्धकाळात काँग्रेस वनवासात असताना सर महमद सादुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगचे मंत्रिमंडळ अस्तित्वात होते. सर सादुल्लांनी गाड्या भरभरून बंगाली मुसलमान आसामात आणून वसविण्याची पद्धतशीर मोहीमच चालवली. पुढे सादुल्ला मंत्रिमंडळ गेले आणि काँग्रेसचे बार्डोलाई यांचे मंत्रिमंडळ अधिकारावर आले तेव्हा त्यांनी हा ओघ थांबविण्याचा प्रयत्न केला. संकल्पित पाकिस्तानात आसामचा समावेश होत नाही हे दिसताच मुस्लिम लीगने आसाममध्ये पद्धतशीरपणे घुसण्याचा सत्याग्रह १९४६ साली आरंभिला. परंतु बार्डोलाई यांच्या खंबीरपणामुळे व गांधीजींनी त्यांना पाठिंबा दर्शविल्यामुळे मुस्लिम लीगची दंडेली चालली नाही. (मंत्रिमंडळ योजना या नावाने ओळखली जाणारी त्रिसूत्री योजना हाणून पाडण्यात बार्डोलाई यांचा फार मोठा वाटा आहे. आसामला या योजनेत बंगालला जोडले जाता कामा नये ही त्यांनी भूमिका घेतली आणि गांधीजींनी त्यांना पाठिंबा दिला. गांधीजी अखेरपर्यंत विरोध करीत राहिले तरी भारत एकत्र राहण्यासाठी पुढे आलेल्या या त्रिसूत्री योजनेबाबत त्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही.) अखेरीला फक्त सिल्हेट जिल्ह्यावर पाकिस्तानला समाधान मानावे लागले.

 परंतु आसाम न मिळाल्याचे शल्य पाकिस्तानच्या नेत्यांना आणि आपला पाकिस्तानात समावेश न झाल्याचे दु:ख आसामच्या मुसलमानांना बोचत राहिले आहे. फाळणीपूर्वी बंगालमधील मुसलमानांच्या आसाममध्ये येऊन स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेला आता आपोआपच राजकीय स्वरूप येऊ लागले. १९४७ पूर्वी ज्या सहजतेने ते बंगाल राज्याची हद्द ओलांडून येऊन आसाम राज्यात राहात होते, तितक्याच सहजतेने १९४७ नंतर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आसामात येऊन राहू लागले. पूर्वी निदान त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न तरी केला गेला. ब्रिटिशांनी व बार्डोलाई मंत्रिमंडळाने या घुसखोरांवर निर्बंध घातले होते. परंतु

भारतीय मुसलमान /१३९