पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/139

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेभेटायला गेलो होतो. १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुका संपल्या होत्या आणि मजलिस-एमुशावरतचा नऊ कलमी कार्यक्रम तेव्हा चर्चिला गेला होता. मशावरतच्या या कार्यक्रमाच्या आधारेच आमचे संभाषण सुरू झाले. त्यांनी अर्थातच मशावरतच्या नऊ मुद्यांचे समर्थन केले. मी त्यांना विचारले, “आपण आयुष्यभर जातीय संघटनांच्या, विशेषतः मुस्लिम जातीयवादी संघटनांच्या विरुद्ध राहिलात. जातीय संघटनांमुळे राष्ट्रीय ऐक्याच्या मार्गात अडथळे निर्माण होतील ही आपली श्रद्धा होती. आता एकाएकी आपले मतपरिवर्तन कसे होणार?" त्यांचे उत्तर मासलेवाईक होते. भारताच्या प्राप्त परिस्थितीत मुस्लिमांनी आपल्या गा-हाण्यांची दाद लावून घेण्यासाठी एकत्र येणे चूक नाही. त्यामुळे नुकसान न होता फायदाच होईल." मुस्लिमांची गा-हाणी कोणती असा प्रश्न मी विचारला नाही. याचे कारण मुसलमान जी म्हणून आपली गा-हाणी मांडतात ती सगळी खरी आहेत अशीच मुळी त्यांची भूमिका असल्यामुळे या मुद्यावर चर्चा निरर्थक होती. परंतु मुस्लिमांनी संघटित राजकारण करण्याचे समर्थन करताना त्यांनी दिलेले कारण ऐकून मी आश्चर्यचकित झालो. ते म्हणाले, “मुस्लिमांनी गेली एक हजार वर्षे भारतावर राज्य केले आहे. त्यांना राज्यकारभाराचा अनुभव आहे. हिंदूंना राज्यकारभार करावयाचे माहीत नाही. देशात सध्या जी दुरवस्था माजली आहे तिचे कारण शासनात मुसलमानांचा वाटा नाही हे आहे. मुसलमान हे संघटित होत आहेत ते स्वतःच्याच भल्याकरिता नव्हे. त्यांना राज्यकारभारात वाटा मिळाल्यामुळे देशाचेच भले होणार आहे. मजलिस-ए-मुशावरत त्यासाठी धडपडत आहे." डॉ. सय्यद महमूद हे आता हयात नाहीत आणि मृत्यूपूर्वी तीन वर्षे आधीच ते राजकारणातून निवृत्त झाले. मजलिस-एमुशावरत फाळणीपूर्वी जुन्या जातीयवादी राजकारणाची कास धरीत आहे असे म्हणून त्यांनी मुशावरतच्या राजकारणातून अंग काढून घेतले. ते अलीगढला कायमचे राहायला आले होते आणि त्यांच्या मृत्यूच्या वर्षभर आधी मी अलीगढला गेलो असताना ते तेथेच राहत आहेत असे कळल्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी माझ्यापाशी काढलेल्या उद्गारांची आठवण त्यांना मला द्यावयाची नव्हती. ते मनाने आणि शरीराने थकलेले व निराश दिसले. भारताचे भवितव्य त्यांना या अवस्थेतही धड दिसत नव्हते. बहुधा मुसलमानांना जिथे राज्य करता येत नाही त्या राज्याचे भवितव्य धड असू शकत नाही असे, त्यांचा मृत्यू जवळ आला असतानाही, त्यांना वाटत होते. त्यांनी तसे मानायला माझी हरकत नव्हती. खर म्हणजे त्यांच्याबद्दल तेव्हा मला राग न येता कीव वाटू लागली. मुस्लिम धर्मवादाच्या प्रभावात पाश्चात्त्य, सुशिक्षित आणि नेहरूंसारख्या प्रगल्भ सुसंस्कृत व्यक्तीचा दीर्घकाल सहवासदेखील कसा निष्प्रभ ठरला याचे हे विदारक उदाहरण पाहून मी खिन्न झालो!

 भारतीय मुस्लिम जातीयवादी संघटनांना प्रचाराला दोन विषय या काळात आयतेच मिळाले. १९६१ च्या जनगणना-अहवालावरून तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या आसामच्या काही जिल्ह्यांत पूर्व पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात बंगाली स्थलांतरित घुसून येऊन राहिले असल्याचे निदर्शनास आले. वस्तुत: गेल्या पन्नास ते साठ वर्षांत पूर्व बंगालच्या उत्तरेकडील जिल्ह्यांतून मुसलमान स्थलांतरितांचे लोंढेच्या लोंढे आसामात येत राहिले आहेत. याला अनेक कारणे होती. एकतर आसामच्या विरळ लोकसंख्येमुळे तेथे

१३८/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान