पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/138

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेवृत्तांताने महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली. आपल्या भाषणात ते म्हणाले, “आम्ही हिंदूंना संस्कृती दिली. हिंदू स्त्रियांना चोळी घालायला आणि पुरुषांना शेरवाणी घालायला व बिर्याणी खायला आम्ही शिकविले – 'गंगाजमुनाके जोबन हमने लूटे हैं।' (पहा - 'Sectlarist', Bimonthly.) या भाषणात त्यांनी तेव्हाचे गृहमंत्री श्री. शंकरराव चव्हाण आणि पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्यावरही असभ्य टीका केली. या प्रक्षोभक भाषणामुळे पुढे महिन्याभरातच औरंगाबाद येथे जातीय दंगल उसळली.
 १९६४ साली हजरत बाल प्रकरणावरून तेंव्हाचे पूर्व पाकिस्तान व भारत येथे भयानक जातीय दंगली झाल्या. या दंगलींमुळे मुस्लिम जातीयवादी राजकारणाला पुन्हा ऊत आला. पुन्हा डॉ. सय्यद महमूद यांनी मुस्लिम नेत्यांची एक परिषद लखनौ येथे बोलाविली. या बैठकीला जमाते इस्लामीलादेखील आमंत्रण देण्यात आले. सर्व जातीय मुस्लिम संघटनांना एका व्यासपीठावर आणून त्यांची संयुक्त आघाडी स्थापन करण्याचा डॉ. सय्यद महमूद यांचा मनसुबा होता हे आता उघड झाले आहे. एरवी जमाते इस्लामीचा समावेश करण्याची त्यांनी केलेली धडपड समजूच शकत नाही. लखनौ अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या भाषणात डॉ. सय्यद महमूद यांनी मुसलमानांच्या नेहमीच्या तक्रारींचे गा-हाणे लाविले तरी कुठेतरी मुस्लिम नेत्यांना आणि जनतेला ते धर्मनिरपेक्ष प्रवाहाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत असे दिसले. याच भाषणात त्यांनी पूर्व बंगालमधून भारतात येणाऱ्या हिंदू निर्वासितांकरिता निधी गोळा करण्याचे मुस्लिमांना आवाहन केले. अर्थात हे आवाहन कागदावरच राहिले. आपल्या व्यापक आवाहनाचा जमाते इस्लामी, जमायते उलेमा आणि मुस्लिम लीग यांसारख्या संघटनांवर काही परिणाम होणार नाही हे डॉ. सय्यद महमूद यांना कळले नाही याचे आश्चर्य वाटते. अनेक वर्षांच्या काँग्रेसच्या सेवेनंतर मुसलमानांचा नेता बनण्याची डॉ. सय्यद महमूद यांनी सुप्त आशा बाळगली तर त्यात आश्चर्य काही नाही. म्हणूनच हिंदू निर्वासितांना आर्थिक साहाय्य करण्याच्या धर्मनिरपेक्ष प्रवृत्तीबरोबरच जमाते इस्लामी आणि मुस्लिम लीग यांसारख्या जातीयवादी व धर्मनिष्ठ संघटनांना देशभक्तीचे आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रशस्तिपत्र देण्याच्य विसंगत भूमिका ते घेऊ लागले.
 डॉ. सय्यद महमूद यांचे हे द्विधा व्यक्तिमत्त्व नवे नाही.एकदा त्यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सभासद असताना, जीनांशी तडजोड करण्याचे जाहीर आवाहन, काँग्रेसच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी विचारविनिमय न करताच केले आणि याकरिता नेहरूंनी त्यांची कानउघडणी केली. १९४२ च्या चळवळीत अटक झाल्यानंतर माफी मागून त्यांनी तुरुंगातून सुटका करून घेतली असा प्रवाद आहे. मौ. आझाद यांच्या 'इंडिया विन्स फ्रीडम' या पुस्तकात याला पुष्टी मिळते. त्यांचे इंग्लंडमध्ये शिक्षण झाले. परंतु मनाने ते सनातनीच राहिले. आपल्या मुलींना त्यांनी (मुस्लिम परंपरेनुसार) शिक्षण दिले नाही. सय्यद महमद यांच्या व्यक्तित्वावर अधिक प्रकाश टाकण्यासाठीच मी या गोष्टींचा उल्लेख केला आहे. एरवी त्यांनी ब्रिटिशांपुढे कितीदा लोटांगणे घातली याच्याशी या पुस्तकाचा विषयाच्या संदर्भात काही संबंध नाही.

 मजलिस-ए-मुशावरतचे ते नेतृत्व करीत असताना १९६८ साली मी त्यांना दिल्ली येथे

भारतीय मुसलमान /१३७