पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाकिस्तानविरोधी भूमिका मी आधीच्या एका प्रकरणात सविस्तर चर्चिली आहे. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर या संघटनांनी उघडउघड पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. अखेरीला आपल्या इच्छेच्या आणि धोरणाच्या विरुद्ध पाकिस्तान झालेच आहे आणि शेवटी ते मुसलमानांचे राज्य आहे. ज्यांनी पाकिस्तान निर्मिले ते चांगले मुसलमान नसले आणि आदर्श इस्लामी राज्य स्थापन करण्याची त्यांच्यात पात्रता नसली तरी हिंदू भारतापेक्षा मुस्लिम पाकिस्तान आपल्याला जवळचे आहे आणि आदर्श इस्लामी राज्यव्यवस्था आज तेथे नसली तरी ती अमंलात आणण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ही थोडक्यात जमायते इस्लामी, जमाती उलेमा आणि तबलिक जमात यांची भूमिका आहे.
 पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश श्री. महंमद मुनीर यांनी धर्मवाद्यांच्या या भूमिकेचा अधिक ऊहापोह केला आहे. येथे त्यांची थोडक्यात दखल घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानात १९५३ साली अहमदिया पंथाविरुद्ध धर्मवादी गटाने आंदोलन केले. या आंदोलनाचे पर्यवसान लाहोर येथे अहमदियाविरोधी क्रूर दंगली होण्यात झाले. या दंगलींची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने न्यायमूर्ती महंमद मुनीर आणि न्यायमूर्ती कयानी यांची नियुक्ती केली.पाकिस्तानातील धार्मिक नेत्यांना श्री. मुनीर यांनी भारतीय मुसलमानांसंबंधी एक प्रश्न विचारला.भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर भारतीय मुसलमानांनी कसे वागावे असा हा प्रश्न होता. सर्व धर्मपुढाऱ्यांनी भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानच्या हिताच्या विरुद्ध वागता कामा नये असे उत्तर दिलेले आहे. मौ. मौदुदी म्हणाले, भारतीय मुसलमानांनी कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या हिताच्या विरुद्ध वर्तन करता कामा नये. त्यांची निष्ठा पाकिस्तानलाच असली पाहिजे. (पहा-Munir Report, pp.218, 227-30.)जे मौदुदी कालपर्यंत जमाते इस्लामीचे नेतृत्व करीत होते आणि ज्यांचे सर्व लिखाण भारतीय जमाते इस्लामी मार्गदर्शनासाठी मानत असते त्यांचे हे मत भारतीय जमाते इस्लामीला मान्य नाही याच्यावर भारतीय जनतेने विश्वास ठेवावा अशी भारतातील जमाते इस्लामी लोकांची मात्र भाबडी कल्पना आहे.

 जमायते उल् उलेमा फाळणीनंतर मोठ्या द्विधा मन:स्थितीत सापडली आहे. त्यांच्या राजकारणाला आणि राजकीय उद्दिष्टांना पाकिस्तानच्या निर्मितीने जबरदस्त अपयश प्राप्त झाले. पाकिस्ताननिर्मितीला कडवा विरोध केल्यामुळे पाकिस्तानात त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहिले जाणे अशक्य होते. भारतातील सर्वसाधारण मुसलमानांनाही त्यांची लबाडीची धर्मनिष्ठ भूमिका नीटशी कळू शकली नव्हती. तथापि भारतीय मुसलमानांच्या जातीयवादी भूमिकेचे समर्थन ते करू लागले आणि मूलतः जमाते इस्लामीच्या भूमिकेशी त्यांचे मतभेद नसल्यामुळे त्यांना सुरुवातीला पाय रोवून बसणे सहज शक्य झाले. जमाते इस्लामीइतकी उघड भारतविरोधी भूमिका आरंभी जमायते उल् उलेमा घेत नव्हती. याचे कारण स्वातंत्र्यकाळात काँग्रेसशी त्यांचा संबंध आल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा त्यांच्यावर थोडासा प्रभाव राहिला होता आणि काँग्रेसचे नेतृत्व त्यांना लगाम घालू शकत होते. शिवाय जमाते इस्लामीला ते प्रतिस्पर्धी संघटना मानत असल्यामुळे तिच्याविरुद्ध भूमिका घेणे त्यांना क्रमप्राप्त होते. त्यांच्या दृष्टीने जमाते इस्लामी त्यांचे नेतृत्व हिरावून घ्यायला टपलेली होती. त्यामुळे जमाते इस्लामीच्या एकूण उद्दिष्टांशी सहमत होत असताना जमाते इस्लामीवर टीका करणे अथवा त्या संघटनेला

१३४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान