पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विरोध करणे हे कार्य जमायते-उल्-उलेमा करीत राहिली.
 तबलीग जमातीमध्ये सर्वच प्रकारच्या धर्मनिष्ठांचा समावेश झालेला आहे. आपण राजकारण करीत नाही, असा तबलीगच्या लोकांचा दावा आहे. हा दावा तसा खोटा आहे हे सांगण्यापूर्वी तबलीगच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती सध्या कुठे कुठे पसरली आहे हे सांगणे उपयुक्त ठरेल. उत्तर प्रदेश हा नेहमीप्रमाणे तबलीगचा मोठा तळ आहे. बिहार, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांत तबलीगचा जबरदस्त प्रभाव पसरलेला आहे. आपण मुसलमानांना त्यांचा धर्म पाळायला सांगतो असे वरकरणी सांगणारे तबलीगचे मौलवी अतिशय पिसाट मनोवृत्तीचे आहेत. गुजरातमध्ये पाकिस्तानलगतच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्याकडे दरम्यानच्या काळात त्यांनी आपली शक्ती केंद्रित केली होती. राजकारणाशी आपल्याला काही कर्तव्य नाही असे सांगणाऱ्या तबलीगचा मला आलेला अनुभव मी येथे नमूद करतो. सुमारे चार वर्षांपूर्वी मी बडोदाला गेलो होतो. तेव्हा भारतभर हिंडून अनेक थरांतील, अनेक विचारांच्या मुस्लिम व्यक्तींना भेटून त्यांचे मनोगत समजून घेण्याचा मी प्रयत्न करीत होतो. बडोदे येथे एका मुस्लिम मित्राने मला त्याच्या हॉटेलात बोलावले. तेथे तबलीग जमातीचे बरेचसे मौलाना उपस्थित होते. माझी या मित्राने त्यांच्याशी ओळख करून दिली आणि आमचे संभाषण सुरू झाले....

मी     :-तबलीग जमातीच्या अधिवेशनाला पाकिस्तानातून प्रतिनिधी येऊ देण्यात येतात का?

एक मौलाना  :-. मला माहीत नाही.
तेथे एक तरुण मौलाना उभा होता. तो मला उत्तरे देत असलेल्या मौलानाला म्हणाला, “आम्हाला राजकीय प्रश्न विचारू नका.आम्ही राजकारणात भाग घेत नाही."

मी       :-राजकीय प्रश्न विचारत नाही. मी माहिती विचारीत आहे. भारत सरकार पाकिस्तानी प्रतिनिधीं भारतात यायला परवानगी देते की नाही? ही माहिती तुम्ही द्यावयाची आहे.

पहिला मौलाना  :-कधी ते येतात. सुरतच्या अधिवेशनात दोन प्रतिनिधी आले होते.दरम्यान त्या दोघांनी मला राजकारणावर प्रश्न विचारू नयेत असे पुन्हा निक्षून सांगितले.

मी       :-सारडा कायद्याबद्दल पब्लिकची भूमिका काय आहे?

पहिला मौलाना  :-आमचा विरोध आहे. गेली चाळीस वर्षे आम्ही विरोध करीत आहोत.

मी       :-त्याचा काही उपयोग नाही. तुमच्या मते तो कायदा धर्मविरोधी आहे.तर मग मुसलमानांनी तोकायदा पाळावा की नाही?

पहिला मौलाना  :-पाळू नये.

मी       :-म्हणजे काय करावे? समजा एका अल्पवयीन मुलीशी एका मुसलमानाने लग्न केले आणि त्याविरुद्ध कोर्टात केस झाली तर त्याने आपला बचाव काय करावा?

भारतीय मुसलमान /१३५