पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/134

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.आवाज आणि प्रभाव फारसा नव्हता. आझादांचे निधन होऊन चुकले होते. हीही बाब या नवीन घडलेल्या घटनांच्या बाबतीत लक्षात घेतली पाहिजे. ते जिवंत होते तोपर्यंत दबल्या गेलेल्या मुस्लिम जातीयवादी शक्ती उफाळून येऊ न देण्याची काळजी ते घेत होते. मुस्लिम समाजाच्या प्रवक्त्याची कामगिरी विद्यमान महनीय नेता या नात्याने आपोआप त्यांच्यावर येऊन पडत होती. आणि ती ते कुशलतेने, कधी मुसलमानांना चार शब्द सुनावून तर कधी स्वत:च मुस्लिम गा-हाण्यांना वाचा फोडून, पार पाडीत होते. त्यांच्या मृत्यूनंतर ज्याचा सल्ला मुस्लिम समाजाला धुडकावणे शक्य नाही अशा दर्जाचा कोणी विचारी मुस्लिम नेता उरला नाही. १९६० नंतर झपाट्याने बदलत जाणाऱ्या राजकीय परिस्थितीत जेव्हा मुस्लिम जातीय शक्ती पुन्हा उफाळून येऊ लागल्या तेव्हा नेतृत्वाची ही अशी पोकळी अस्तित्वात होतीच.
 उत्तर प्रदेशात तर या काळात अनेक छोट्या-मोठ्या मुस्लिम संघटना अस्तित्वात आल्या होत्या. मुस्लिम लीग कागदावर तरी अखिल भारतीय संघटना म्हणून वावरत होती. जमाते इस्लामीने आपले कार्यक्षेत्र वाढविले होते. १९४८ ला मौ. मौदुदी पाकिस्तानात निघून गेले. त्यांच्या जाण्याची अनेक कारणे सांगितली जातात. एक म्हणजे पाकिस्तानचे नवे राज्य इस्लामी बनविण्याच्या ईर्ष्येने ते निघून गेले असे सांगण्यात आले. मुस्लिम अल्पसंख्यांक असलेल्या भारतापेक्षा मुस्लिम बहुसंख्यांक असलेल्या पाकिस्तानात इस्लामी राज्याचा प्रयोग करता येणे त्यांना अधिक अनुकूल वाटले तर त्यात आश्चर्य नाही. परंतु एक तर्क असाही आहे की भारत सरकारने त्यांच्या अटकेचे वॉरंट काढले होते आणि केंद्रीय गृहखात्यातील एका वरिष्ठ मुस्लिम अधिकाऱ्याने याची त्यांना माहिती दिल्यामुळे ते बिनबोभाट पाकिस्तानात जाऊ शकले. त्यांच्या प्रयाणानंतर मौ. अबू लईस हे जमाते इस्लामीचे प्रमुख बनले. स्वातंत्र्योत्तर बदलत्या परिस्थितीत जमाते इस्लामीच्या उद्दिष्टांत तांत्रिक बदल करण्याचा चाणाक्षपणा करण्यात आला. पूर्वी, हुकूमते आलिया (ईश्वराचे राज्य) स्थापन करणे हे उद्दिष्ट होते. आता हुकूमते दिन (धर्माचे राज्य) हे उद्दिष्ट बनले. ईश्वराच्या राज्याऐवजी (ईश्वराचे राज्य म्हणजे मुसलमानांचे राज्य असा अर्थ होतो) धर्माचे राज्य हा बदल केवळ तांत्रिक आहे, त्याला फारसा अर्थ नाही, जमाते इस्लामीची उद्दिष्टे पूर्वीचीच आहेत, अशी निवेदने जमाते इस्लामीच्याच प्रवक्त्यांनी केली आहेत. तथापि उद्दिष्टांतील हा बदल खरा आहे असे मानले तरी धर्माचे राज्य म्हणजे काय? कोणत्या धर्माचे राज्य याचे नीट स्पष्टीकरण जमाते इस्लामीच्या प्रवक्त्यांनी कधीच केले नाही. या बाबतीतील त्यांचा युक्तिवाद थोडक्यात असा की धर्माचे राज्य म्हणजे धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांचे राज्य. धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांनी धर्माच्या कायद्यानुसार शासनव्यवस्था अंमलात आणली पाहिजे. याचा अर्थ असा की हिंदूंनी हवे तर मनुस्मृतीनुसार भारताचे राज्य करावे. जर हिंदूंना हे शक्य नसेल तर त्याचा अर्थ हिंदू धर्मात धर्म-राज्यव्यवस्था अंमलात आणण्याची शक्ती नाही असा होतो. तसे असल्यास त्यांनी आमच्यावर ही कामगिरी सोपवावी. आमच्या धर्मात ही पात्रता आहे. (पहा - मौ. मौदुदी यांचे भाषण.) आम्ही ही कामगिरी पार पाडू शकतो.

 जमाते इस्लामीच्या या धोरणानुसार स्वातंत्र्योत्तर काळातील मुस्लिम राजकारणाची दिशा समजता येण्याजोगी आहे. जमाते इस्लामी किंवा जमायते उल् उलेमा यांची

भारतीय मुसलमान /१३३